(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination: लसीकरणासंदर्भात मोठी बातमी! आता गल्लीबोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण शक्य!
कोरोना महामारीच्या काळातील वाईट अनुभवातून केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशनने औषध विक्रेत्यांच्या औषधी संदर्भातल्या ज्ञानाचा वापर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी करण्याचा ठरवलं आहे.
Corona Vaccination: कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता गल्ली बोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण करून घेता येणार आहे. कोरोना महामारीच्या काळातील वाईट अनुभवातून केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशनने (Indian Pharmaceutical Association) औषध विक्रेत्यांच्या औषधी संदर्भातल्या ज्ञानाचा वापर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी करण्याचा ठरवलं आहे.
तीन दिवसीय कॉन्फरन्समध्ये औषध क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा
नुकतच नागपुरात इंडियन फार्मास्यूटिकल कॉन्फरन्स पार पडली. या तीन दिवसीय कॉन्फरन्स मध्ये औषध क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सोबतच देशभरातील साडेबारा लाख पेक्षा जास्त नोंदणीकृत औषध विक्रेत्यांना यापुढे वॅक्सिनेटर म्हणून प्रशिक्षण देऊन लसीकरणासाठी त्यांचा सहभाग घेण्याचे ही तत्वतः ठरवण्यात आलं आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मास्यूटिकलच्या देखरेखित इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशन एक प्रशिक्षण कार्यक्रम आखणार आहे.
औषध विक्रेत्यांना पंधरा दिवसांचं ऑनलाईन आणि पंधरा दिवसांचं ऑफलाइन प्रशिक्षण
पंधरा दिवसांचं ऑनलाईन आणि त्यानंतर पंधरा दिवसांचं ऑफलाइन प्रशिक्षण औषध विक्रेत्यांना दिल्यानंतर त्यांना लसीकरण करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसे झाल्यास विविध रोगांविरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेलं लसीकरण, लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांना दिल जाणारा लसीकरण यापुढे जवळच्या औषध विक्रेत्याच्या दुकानात जाऊन करता येणं शक्य होणार आहे.
औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून लसीकरणाची ही योजना भविष्यात क्रांतिकारक ठरणार
औषध विक्रेत्यांना लसीकरणासाठी सरकारने निश्चित केलेला दर आकारण्याची परवानगीही राहणार आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता भविष्यात कोरोना सारखी महामारी आल्यास आरोग्य यंत्रणा तोकडी पडून पुन्हा अनेकांचे जीव जाईल अशी स्थिती उद्भवू नये. म्हणून औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून लसीकरणाची ही योजना भविष्यात क्रांतिकारक ठरणार अशीच अपेक्षा आहे.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा अपुरी पडल्यामुळं अनेक बळी गेले. आरोग्य यंत्रणेने शर्थीचे प्रयत्न करुन अनेक जीव वाचवले देखील. कोरोना लसीकरणाच्या संदर्भात देखील आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळाचा प्रश्न वेळोवेळी चर्चेत आला होता. केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशनने औषध विक्रेत्यांकडून लसीकरण करण्याचा हा निर्णय प्रत्यक्षात उतरल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
ही बातमी देखील वाचा