Coronavirus | कोविड टास्क फोर्समधील महिला IAS अधिकारी कोरोनाग्रस्त
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकारला धक्का बसला आहे. सरकारने नेमलेल्या कोविड टास्क फोर्समधील महिला आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. एवढंच नाही तर अधिकारी राहत असलेल्या इमारतीमधील काम करत असलेले 25 कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : एकीकडे राज्य सरकार पुनश्च हरिओम करत आहे, लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र त्यातच एक मोठा धक्का बसला आहे. कोविड-19 वर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्समधील महिला आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील रुग्णालय विशेषतः कोरोनाच्या उपाययोजनांची महत्त्वाची जबाबदारी या अधिकाऱ्यावर आहे, परंतु त्यांनाही कोविड-19 झाला आहे.
दरम्यान आतापर्यंत राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि प्रशासनातील तीन अधिकारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीनपैकी दोन अधिकारीही कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या आयएएस अधिकाऱ्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
याआधी राज्यात दोन आयएएस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यातील एक महिला अधिकारी मजुरांच्या व्यवस्था पाहणाऱ्या टास्क फोर्समध्ये काम करत होत्या. त्यानंतर ऊर्जा खात्यातील आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरी घरकाम करणारा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
हे अधिकारी मंत्रालयाजवळच असलेल्या यशोधन इमारतीत राहतात. घरातील स्टाफ कोरोनाग्रस्त झाल्यावर इमारतीतील सगळ्यांच्या चाचण्या झाल्या. ज्या स्टाफची कोरोना चाचण्या करण्यात आली त्यात या इमारतीत घरकाम करणारे, स्वयंपाक करणारे, वाहनचालक असे 25 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या इमारतीमधील महिला आयएएस अधिकारी आणि स्टाफ असे अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
या इमारतीत मंत्रालयात काम करणारे अनेक अतिवरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत हे अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी ही कोरोनाग्रस्त झाल्याने पुनश्च हरिओम करणाऱ्या सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.