(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात दारूची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे
बीड : मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.
डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी एक दिवस जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून ही होम डिलिव्हरीची सुविधा सुरु केला जाणार आहे.
मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा
याशिवाय महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. वाईन शॉप बाहेर होणाऱ्या गर्दीपासून सुटका व्हावी आणि कोव्हिड -19 रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी ही ई - टोकन सुविधा सुरु करण्याच निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केला आहे.
ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई - टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून दारू खरेदी करु शकणार आहे.