(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली, नाशिकला परतीच्या पावसानं झोडपलं, जालन्यात वीज पडून तिघांचा मृत्यू
नाशिक, सांगली आणि राज्यातील इतर भागाला परतीच्या पावसानं झोडपलं. तर जालन्यातील सावरगाव भागडे या गावात दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे.
मुंबई : नाशिक, सांगली आणि राज्यातील इतर भागाला परतीच्या पावसानं झोडपलं आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. तर नाशिकमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
नाशिकमध्ये आज जोरदार पाऊस झाला. कालिका यात्रेनिमित्त जमलेले भाविक आणि तेथील विक्रेत्यांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. रविवारचा दिवस असल्याने हजारो भाविक कालिका देवीच्या दर्शनासाठी जमले होते. पुढील तीन दिवस नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तिकडे सांगलीत पूर्वेकडील दुष्काळी भागातही शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवठेमहाकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. खानापूर भागातील अग्रणी नदीला कित्येक वर्षांनी पूर आला. तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहाकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीतही अग्रणी नदी तुडूंब भरुन वाहू लागली आहे. शनिवारी रात्री सलग 4-5 तास पाऊस सुरु होता. यामुळे परतीच्या पावसाने दुष्काळी भागातील नागरिकांची चिंता काहीशी मिटली आहे.
जालन्यातील सावरगाव भागडे या गावात दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे. मयतांमध्ये दोन महिला असून त्या मजुरीसाठी शेतात गेल्या असताना दुपारी त्यांच्यावर वीज कोसळली. दोन जखमींना जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
मयतांची नावे
1. गायबाई गजानन नाईकनवरे (35 वर्ष) 2.संदीप शंकर पवार (30 वर्ष) 3. मंदाबाई नागोराव चाफळे (35 वर्ष)