आधी पावसाची प्रतीक्षा, आता अतिवृष्टीने हाल, मराठवाड्यात 39 दिवसात 28 बळी, शेतीचंही नुकसान
मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं 39 दिवसात 28 बळी गेल्याची घटना घडली आहे.
Marathwada rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काबी ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर काही भागात मुसळधार पावसामुळं जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहे. मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं 39 दिवसात 28 बळी गेल्याची घटना घडली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची जनावरे देखील दगावली असून, शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
आठ जिल्ह्यांतील 28 मंडळांत धुवाधार पाऊस
पावसाचा खंड पडलेल्या मराठवाड्यात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत सर्वच आठ जिल्ह्यांतील 28 मंडळांत धुवाधार पाऊस बरसला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही मंडळांचा यात समावेश आहे. त्यामुळे विभागातील 560 गावे या पावसामुळे चिंब झाली आहेत. दरम्यान, मराठवाड्यात गेल्या 39 दिवसात पावसाने 26 बळी घेतले आहेत. यात पाण्यात वाहून जाणे, वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. लहान, मोठी मिळून 385 जनावरे दगावली आहेत. तर 55 गोठे पावसाने पडले आहेत, तर 495 मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 1208 शेतकऱ्यांच्या 922 हेक्टर जिरायत जमिनीचे नुकसान झाले असल्याची नोंद आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली मंडळे जिल्हानिहाय
छत्रपती संभाजीनगर : 03
जालना : 03
नांदेड : 01
लातूर : 03
धाराशिव : 03
परभणी : 03
बीड : 05
हिंगोली : 07
एकूण : 28
शेतीच्या कामांना वेग
ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र 20.90 लाख हेक्टर असून आत्तापर्यंत जिल्ह्यात 18.91 लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग कापूस भुईमूग या पिकांच्या पेरण्या प्रगतीपथावर असल्याचेही सांगण्यात आले.
जायकवाडी धरणामध्ये केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक, आणखी पावसाची गरज
छत्रपती संभाजीनगर विभागात 28 मंडळात अतिवृष्टी जरी झाली असली तरी अद्यापही धरणांमधल्या पाण्यासाठ्यात वाढ झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातील 300 खेड्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणाच्या कडेवर शंख शिंपल्यांचा खच जमा झाला आहे. जवळपास अर्धा ते एक फुटाचा हा थर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं अद्यापही मराठवाड्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
महत्वाच्या बातम्या:
Weather Update : राज्यात आज कुठं कुठं पडणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर