(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Heat Wave : पुढील पाच दिवस महाराष्ट्र तापणार, दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढणार तापमान
Heat Wave : पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे.
Heat Wave : महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरीच्या 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
29 मार्च रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 30 मार्च रोजी खान्देशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या 4.5 अंश ते 6.4 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात जैसे थे परिस्थिती कायम राहणार आहे. चंद्रपुरात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
27 Mar, येत्या 5 दिवसात #महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट #heatwave जाणवेल.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 27, 2022
- IMD
काळजी घ्या आणि #IMD कडून अपडेट्स पहा. pic.twitter.com/V0OsKh2L6V
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान कमालीचं वाढताना दिसत आहे. 14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्यातील तापमान सर्वात जास्त आहे. तापमान वाढीत मागील पाच दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. पुणे शहर आणि परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली जात असून उकाडा मात्र कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात आज 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले होते. पुढील आठवडा भरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
23 मार्च ते 27 मार्च अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद आहे. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत. राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : महाराष्ट्र तापतोय, काळजी घ्या...! 'या' जिल्ह्यांत सर्वाधिक तापमान