संजय राठोडच्या जागी मला मंत्री करा!, हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या ठिकाणी मला मंत्री करा अशा आशयाची दोन पत्रे हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहली आहेत.
मुंबई : संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले असून त्यासाठी आता हरिभाऊ राठोड यांनी कंबर कसली आहे. संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून त्यासाठी त्यांनी दोन पत्रंही लिहली आहेत.
हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात असल्याचा उल्लेख हरिभाऊ राठोड यांनी केलाय. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल असं सांगितलंय.
आपण शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण मोठा त्याग केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पहिल्या पत्रात उद्धव ठाकरे ह्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण किती प्रयत्न आपण केले हे सांगत 10 मिनिटे वन टू वन चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. संजय राठोड प्रकरणामुळे राजकीय परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवायचं आहे म्हणून सुद्धा ही वेळ मागितली आहे असंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.
संजय राठोड हे सध्याचे बंजारा समजाचे निर्विवाद नेते आहेत. त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजाच्या नेत्यांत नेतेपदासाठी आणि मंत्रिपदासाठी नवी शर्यत सुरु झाल्याचं पहायला मिळालंय.