दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार असल्याने पंढरपुरात दिवाळी जोरात, व्यापाऱ्यांना कार्तिकीचे वेध
दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार असल्याने पंढरपुरात दिवाळी जोरात साजरी होणार आहे. व्यापाऱ्यांनाही कार्तिकी यात्रेचे वेध लागले आहेत.
पंढरपूर : कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर येत असलेल्या दिवाळीला पंढरपुरात अमाप उत्साह असून यंदा कार्तिकी यात्रा होणार असल्याने व्यापाऱ्यांतही मोठा उत्साह आहे. पंढरपूर शहराचे अर्थचक्र वर्षभरात येणाऱ्या चार वज्र्य आणि लाखो भाविक यांच्यावर अवलंबून असते. वारकरी आणि पर्यटकांसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठी बाजारपेठ पंढरपुरात आहे.
मंदिर परिसरात प्रासादिक साहित्य, कुंकू बुक्का, चिरमुरे, बत्तासे यासोबत पितळी मूर्ती, वारकरी वाद्ये यांची मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय अलीकडच्या काळात देवाच्या विविध छटातील प्रतिमा आणि फायबरच्या मूर्तींनाही मोठी मागणी असल्याने सर्वच दुकानात विविध आकारातील विठ्ठल रुक्मिणीच्या सुबक मूर्ती विक्रीसाठी असतात. गावातील हॉटेल, लॉजेस आणि इतर लहान मोठ्या व्यापाऱ्यांचेही आर्थिक चक्र हे येणाऱ्या वारकऱ्यांवर अवलंबून असते.
या चार वाऱ्या आणि वर्षभर देशभरातून येणारे पर्यटक यामुळे पंढरपुरात जवळपास 500 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे तब्बल सहा यात्रा न झाल्याने पंढरपूरचे आर्थिक चक्र रुतून बसले होते. व्यापारी कर्जबाजारी झाले होते. मात्र, यंदा कार्तिकी यात्रा भरणार असल्याने व्यापारी आणि नागरिकांची दिवाळी जोरात आहे.
कार्तिकी यात्रा हीच खरी व्यापाऱ्यांसाठी दिवाळी ठरणार
विठ्ठल मंदिरावर संपूर्णपणे अवलंबून असणारा मोठा वर्ग शहरात असल्याने यंदा कार्तिकी वारी होणार असल्याने मोठा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. सध्या अजूनही आर्थिक घडी बसली नसली तरी दिवाळी खरेदीला पंढरपूरकरांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आकाशदिवे, फटाके, कपडे आणि मिठाई खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. सध्या लसीकरणामुळे कोरोना रुग्णसंख्या पूर्णपणे संपत चालली असताना आता पुन्हा कोरोनाचे संकट येऊ नये अशीच प्रार्थना प्रत्येक नागरिक विठुरायाला करत आहे.