Gudi Padwa 2021: केव्हा आहे गुढीपाडवा, जाणून घ्या या दिवसाचा मुहूर्त, तिथी आणि पूजा विधी
Gudi Padwa 2021: यंदाच्या वर्षी गुढीपाडवा 13 एप्रिल, मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे.
Gudi Padwa 2021: चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे शालिवाहन संवस्तराचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवसाकडे अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं.
यंदाच्या वर्षी गुढीपाडवा 13 एप्रिल, मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. याच दिवसापासून नवरात्रोत्साच्या पर्वालाही सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा हे पर्व महाराष्ट्रासोबतच गोवा आणि केरळ इथंही हा सण साजरा केला जातो. या भागांमध्ये हा दिवस 'संवत्सर पडवो' या नावानं ओळखला जातो. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंद्र प्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये 'नवरेह', मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.
गुढीपाडवा मुहूर्त...
दिवस - 13 एप्रिल 2021
सूर्योदय- सकाळी 6 वाजून 24 मिनिटे
सूर्यास्त- सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटं
काय आहे पूजाविधी?
गुढिपाडव्याच्या दिवशी सरस्वती देवीची पूजाही केली. या दिवशी गुढी उभारण्याचं विशेष महत्त्वं असतं. उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते. सहसा ती घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते. अर्थात शहरी भागात हे अनेकदा शक्य नसल्यामुळं गुढीच्या उंचीपेक्षा ती उभारण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं.
Gudi Padwa 2021: डोंबिवलीत गुढिपाडव्याला होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घेतली जाते. ज्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र, किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टींवर तांब्या (कलश) उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवला जातो. सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहिलं जातं. ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ धुवून घेतली जाते. इथं पाटावर कलश मांडून यत्यामध्ये आंब्याची पानं, त्यावर नारळ ठेवून करा तयार करण्यात येतो. ज्यावर हळदकुंकू वाहून त्याची पूजा करण्यात येते. या कलशापुढेच गुढीचा खास नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी ही गुढी घरावरून उतरवण्यात येते.