Gudi Padwa 2021: डोंबिवलीत गुढिपाडव्याला होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीमागोमाग आता गुढिपाडव्यावर कोरोनाचंं सावट. सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडवा साध्याच पद्धतीनं होणार साजरा
डोंबिवली : गुढिपाडव्याला राज्यात सर्वच ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. याच स्वागत यात्रेची सुरवात डोंबिवली मधून झाली असंही म्हटलं जातं. स्वागतयात्रेचा वसा पुढे नेणारी डोंबिवली मुळात या गोष्टीसाठीच जास्त ओळखली जाते. पण, यंदा मात्र उत्सवाच्या उत्साहावर कोरोनाच्या संसर्गानं विरझण टाकलं आहे.
डोंबिवलीमधील प्रसिद्ध श्री.गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीनं दरवर्षी स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. मात्र कोरोनामुळे मागच्या वर्षी या शृंखलेमध्ये खंड पडला. त्यावेळी पुढच्या वर्षी नव्या उत्साहात स्वागतयात्रा आयोजित करण्यात येईल असं सांगण्यातही आलं. पण, परिस्थिती काहीशी सुधरतेय असं दिसून आलं आणि पुन्हा एकदा कोरोनामुळं जीवनाची घडी विस्कटली. ज्यामुळं यंदाच्या वर्षीही डोंबिवली येथील नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाची नववर्ष स्वागत यात्रा रद्द केल्याची माहिती श्री. गणेश मंदीर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली आहे. स्वागत यात्रा रद्द करण्यात आली असली, तरीही मंदिरात धार्मिक कार्यक्रम अंत्यत कमी लोकांच्या उपस्थित आणि कोरोनाचे नियम पाळून केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राहुल द्रविडमागोमाग आता, आगळीवेगळी दहशत 'इंद्रनगरच्या गुंडी'ची
फक्त डोंबिवलीच नव्हे, तर राज्यातील अनेक ठिकाणी गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात करणारा हा सण बहुविध कारणांनी साजरा केला जातो. पण, मागचं वर्ष आणि यंदाचं वर्षही या सणाचा उत्साह सर्वांनाच आवरता घ्यावा लागणार आहे. सध्याच्या घडीला गुढिपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा आणि स्वागत यात्रांचं आयोजन होणार नसलं तरीही कोरोनाचे नियम पाळत पूजाविधी पार पडणार आहेत असं सांगण्यात येत आहे. पण, आता शासनाकडून निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्यानंतर मात्र नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.