Gram Panchayat Election 2021 | ग्रामपंचायतीत पडला पण बॅनरमुळे सोशल मीडियावर जिंकला
लातूर जिल्ह्यातील पराभूत झालेल्या उमेदवाराच्या बॅनरनं या विजयी उमेदवारांनाही मागे टाकलं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Gram Panchayat Election 2021 राज्यात काही दिवसांपूर्वीच यंदाच्या वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आले आणि एरक धुरळा उडाला. यातच यंदा, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक किस्से मोठे रंजक घडले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पतीस खांद्यावर नेणारी पत्नी असो, किंवा जेसीबीच्या फळ्यावरील मिरवणूक असो. विजयी उमेदवाराने आपला विजय साजरा करताना भन्नाट गोष्टी केल्या. मात्र लातूर जिल्ह्यातील पराभूत झालेल्या उमेदवाराच्या बॅनरनं या विजयी उमेदवारांनाही मागे टाकलं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. कारण बॅनरवरील त्या उमेदवाराचं मनोगतच अफलातून आहे.
बॅनरवर लिहिल्याप्रमाणं हा उमेदवार म्हणतो,
'वाटलं होतं गड्या आपला गाव बरा ....पण तुम्ही म्हणलो पसारा भरा ....आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. समाजाने नाकरल... गावानं नाकरलं, मात्र आम्हाला देश स्वीकारणार...'
पराभवाचे हे शल्य असं लिहून बॅनरवर, आपल्याला मिळालेल्या अवघ्या 12 मतांसाठीही या पठ्ठ्यानं मतदारांचे आभार मानले आहेत. 'सात जन्म तुमचे हे उपकार विसरणार नाही', असं लिहलेले बॅनर गावात लावले.
'तुमच्या मताचे देशात नाव करीन', असं वाक्यही त्यात होतं. हे बॅनर अल्पावधीतच सोशल मीडियात व्हायरल झालं. संपूर्ण राज्यात 'त्या' बारा मतदाराच्या मताचं नाव झालं. ही किमया करणारा तरुण आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर येथील विकास शिंदे कोनाळीकर.
अहमदपूर इथं त्याचं पॉलिटेक्निकचं शिक्षण सुरु आहे. काही काळासाठी तो पुण्यातही वास्तव्यास होता. पुढं गावात निवडणुकीचे वारे वाहत होते, अशातच आपणही गावच्या विकासात हातभार लावला पाहिजे, गावातील शिक्षण-रस्ते-वीज आणि पाणी या मूलभुत प्रश्नांना मार्गी लावलं पाहिजे अशा आशावादासह तो निवडणुकीत उतरला. पण, फक्त आशावाद असून काही होत नाही त्यासाठी योग्य राजकीय कसबही लागतं याची जाणीव निकाल नंतर त्याला झाली.
निकालाच्या दिवशी विकास शिंदेची घोर निराशा झाली. कारण अवघी बारा मतंच त्याला मिळाली होती. ज्या बारा मतदारांनी त्याच्यावर विश्वास दाखवला होता, त्यांच जाहीर आभार तर मानले पाहिजेत, ते कोण आहेत हे माहीत नसल्यामुळे त्यानं थेट गावात बॅनर लावले. बारा मतदारांनी आपल्याला संघर्ष करण्याची ताकद दिली आहे, याच बारा मतदारांच्या मतांवर देश आपल्याला स्वीकारेल हा आशावाद नजरेसमोर ठेवत त्यानं अनोखा निर्णय घेतला.
हे बॅनर गावात झळकले आणि त्याचीच चर्चा सुरू झाली. ज्यावेळी हे बॅनर सोशल मीडियात व्हायरल झाले आणि त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. विजयी उमेदवाराचे बॅनर आणि पेपर मधील जाहिरातीत निवडणुकीत पराभूत होऊनही अनेकांचीच मनं जिंकणाऱं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.
या उमेदवाराचा आशावाद कायम
'गावाच्या विकासाची स्वप्नं बघून मी निवडणुकीत उतरलो होतो. मतदारांना माझे विचार पटले नाहीत, मात्र मी निराश नाही. मी तरुण आहे, अजूनही अनेक निवडणुका आहेत. एकदा जनसेवा करायची हे ठरवलंच आहे. त्यामुळ भविष्यात यश मिळेल'. असा आशावाद विकास व्यक्त करत आहे.