Governor Nominated MLC : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 6, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा
Governor Nominated MLC : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
Governor Nominated MLC : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर (Maharashtra Assembly Monsoon Session) राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिवेशनानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना यादी पाठवली जाणार आहे, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गाजला
राज्यात ठाकरे सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत माजी राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. यावरुन राजकारणही रंगले होते. उद्धव ठाकरेच नाहीत तर खुद्द शरद पवार यांनी देखील भगत सिंह कोशयारी यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली. मात्र आता नियुक्तीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड नेमकी कशी होते तेही पाहूया
- विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे
- ही नियुक्ती करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो
- कलम 163 (1) अंतर्गत विधानपरिषदेच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्ती करु शकतात.
- तर कलम 171 (5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते.
- मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदारांची नियुक्ती करु शकतात. मात्र, अंतिम निर्णय हा राज्यपालांचा असतो.
12 जागांवर कोणाची नियुक्ती?
दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्थगिती हटवल्यानंतर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागांवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. 2019 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॅाबिंग करत आहेत.
संबंधित बातमी