(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची उदासीनता, महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून;एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे गेली अनेक वर्ष महागाई भत्ता दिला जातो. त्याची उजळणीवजा घोषणा एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांनी केली होती.
Maharashtra ST Mahamandal News: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) प्रश्नांवर राज्य सरकारची उदासीनताच असून महागाई भत्त्याची (Dearness Allowance) फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयात तशीच धूळ खात पडून असल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसनं केला आहे. मोठा गाजावाजा करत एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणं महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केली होती. मात्र घोषणा करुन दोन महिने उलटले तरी या संदर्भातील फाईल्स मंत्रालयात धूळ खात पडल्या आहेत. हे सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कायम उदासीन असल्याचा आरोप एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. तसेच, एसटीच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभात करण्यात आलेली ही घोषणा हवेत विरून जाऊ नये, असंही बरगे यांनी म्हंटलं आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे गेली अनेक वर्ष महागाई भत्ता दिला जातो. त्याची उजळणीवजा घोषणा एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र अजूनही एकूण 8 टक्के थकीत महागाई भत्ता अद्याप मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सुद्धा या संदर्भातील फाईल दोन महिन्यांपासून सरकार दरबारी धूळखात पडून आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार संवेदनशील नसल्याचं वारंवार सिद्ध होत आहे, असा आरोपही बरगे यांनी केला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 34 टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे, ही गंभीर बाब असल्याचंही बरगे म्हणाले आहेत.
थकीत 8 टक्के महागाई भत्त्याच्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचा नेहमी प्रमाणे अपेक्षाभंग होऊ नये : श्रीरंग बरगे
निधी अभावी, भविष्य निर्वाह निधी, उपदान, अशी मिळून अंदाजे 800 कोटी रुपयांची रकमेचा अद्यापही ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांनी घेतलेलं बँक कर्ज, पत संस्था कर्ज आणि इतर देणी संबधित संस्थांना देण्यात आलेली नाहीत. एसटीकडे निधीची कमतरता असल्यानं ही रक्कम सरकारकडून मिळावी यासाठी या भत्त्यातील पहिल्या टप्प्यातील 4 टक्के महागाई भत्ता देण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आला आहे. अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. ती फाईल सरकारकडे निर्णयाविना प्रलंबित असल्यानं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वाढलेल्या 4 टक्के महागाई भत्त्याची मागणी महामंडळाने सरकारकडे केलीच नाही. एकूण 8 टक्के महागाई भत्ता मिळणं बाकी आहे, असं असताना प्रचंड वाढलेल्या महागाईत कर्मचारी त्रस्त असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. थकीत 8 टक्के महागाई भत्त्याच्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचा नेहमी प्रमाणे अपेक्षाभंग होऊ नये असंही बरगे यांनी म्हटलं आहे.