कोणी म्हणतंय 17 लाख... कोणी म्हणतंय 18 लाख... पण राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या नेमकी किती?
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आंदोलनाबाबत एक परिपत्रक काढले आहे. ज्यांच्यासाठी हे आंदोलन होत आहे, त्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे? याबाबत वेगवेगळे दावे केले जात असल्यामुळे संभ्रम आहे.
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये बैठक पार पडली, पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जुनी पेन्शन योजना हा राज्यात कळीचा मुद्दा झाला आहे. यामागे विरोधकांचा डाव असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. तर याच मुद्द्यामध्ये आगामी निवडणुकीचा निकाल ठरवण्याची ताकद असल्याचं जाणकार सांगतात. ज्यांच्यासाठी हे आंदोलन होतेय, त्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे? याबाबत वेगवेगळे दावे केले जात असल्यामुळे संभ्रम आहे.
परिपत्रकातच कर्मचाऱ्यांची संख्या वेगवेगळी!
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आंदोलनाबाबत एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये किती कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार याची माहिती दिली आहे. मात्र परिपत्रकातच कर्मचाऱ्यांची संख्या एकसारखी असल्याचे दिसत नाही. एकाच परिपत्रकात कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी आहे. एका ठिकाणी 18 लाख कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले तर दुसऱ्या ठिकाणी 17 लाख कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नेमके कर्मचारी किती? असा प्रश्न निर्माण होतो. वेगवेगळ्या कर्मचारी संघटना वेगवेगळे आकडे देत असल्यामुळे हा संभ्रम आणखी वाढत चालला आहे.
मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी संघटना एकूण संख्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. कधी 17 तर कधी 18 लाख... काही ठिकाणी तर राज्यातील एकूण सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 19 लाख असल्याचे सांगितले जाते. पण गेल्या काही वर्षांत एकही मेगाभरती झाली नाही, तरीही कर्मचाऱ्यांची संख्या तितकीच कशी? कोणता कर्मचारी निवृत्त झाला नाही का? असा सवाल उपस्थित होतो. त्याशिवाय गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी संघटना लाखो जागा रिक्त असल्याचा दावा करत आहेत. त्याचं काय?
18 लाख कर्मचाऱ्यांचा आकडा नेमका आला कसा?
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 16 लाख असल्याचं सांगितले होते. तर काही कर्मचारी संघटनेकडून वेगळाच आकडा सांगितला जातो. नुकत्याच आलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 7.25 लाख असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही. निमशासकीय कर्मचारी म्हणजे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महामंडळे येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांची संख्या मूळ राज्य सराकारी कर्मचाऱ्यांइतकीच ग्राह्य धरली तर एकूण संख्या 14 ते 15 लाखांच्या आसपास जाते. मग हा 18 लाखांचा आकडा नेमका आला कसा? राज्यातील एकूण सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या नेमकी किती? मागील दहा वर्षांपासून राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी भरती झालेली नाही. पण या काळात काही कर्मचारी निवृत्त झाले असतील. तसेच कोरोनाच्या काळातही काही जणांना आपला जीव गमावावा लागला असेल. तर मग वर्षानुवर्षे सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 18 लाख कशी राहते? राज्यातील एकूण सरकारी कर्मचारी किती आहेत? याबाबत मात्र संभ्रम आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :