Corona Vaccination | लसीकरण न करताच मिळाले प्रमाणपत्र, सोलापुरात तांत्रिक दोषामुळे नागरिकांना मनस्ताप
लसीकरण न करताच काहींना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. मात्र प्राथमिकदृष्ट्या तांत्रिक बाबींमुळे अशा पद्धतीने प्रमाणपत्र जात असल्याची माहिती यामध्ये प्राप्त झाली आहे.
सोलापूर : सोलापुरात लसीकरण मोहिमेत तांत्रिक अडचणी येताना पाहायला मिळतायत. लसीकरण न करताच अनेकांना लसीकरण झाल्याचे मेसेज येतायत. त्यामुळे लसीकरण न करताच काहींना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच कोव्हिन अॅपवर नोंदणी केलेले नागरिक जेव्हा लसीकरणसाठी जेव्हा केंद्रावर गेले तेव्हा तुमचे आधीच लसीकरण झालंय. त्यामुळे आता पुन्हा लसीकरण करता येणार नाही असे उत्तर देण्यात आले. कोणतंही लसीकरण झालेलं नसताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे नागरिकांना देखील धक्काच बसला.
मात्र प्राथमिकदृष्ट्या तांत्रिक बाबींमुळे अशा पद्धतीने प्रमाणपत्र जात असल्याची माहिती यामध्ये प्राप्त झाली आहे. एकीकडे लसीकरण महोत्सव सुरू असताना तांत्रिक बाबींचा बोजवारा उडताना पाहायला मिळतोय. ज्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावे लागत आहे. सोलापुरातील दाराशा नागरी आरोग्य केंद्रात जवळपास 10 ते 15 जणांना असाच अनुभव आल्याची माहित सध्या प्राप्त होत आहे.
Mumbai Corona Outbreak : मुंबईत कोरोना आणीबाणी, महापालिका आयुक्तांकडून अॅक्शन प्लॅन तयार
"मी लस घेण्यासाठी दाराशा हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी गेलो. तिथे माझी रितसर नोंद करण्यात आली. मात्र ऐन लस देण्याच्या वेळी तुम्हाला लस देता येणार नाही. तुमचे वय आणखी 45 पूर्ण नाहीये. तुम्हाला आणखी 15 दिवस बाकी आहेत. त्यानंतर असं उत्तर देण्यात आले. मात्र संध्याकाळी तुमचे लसीकरण झाले आहे. असे मेसेज मला प्राप्त झाले" अशी माहिती रिक्षाचालक असलेल्या राजशेखर शंकरप्पा पाटील यांनी दिली.
Maharashtra Lockdown: लॉकडाऊनची मानसिकता ठेवा! घोषणेआधी जनतेला पूर्वसूचना देणार : राजेश टोपे
तर "माझ्या मेहुण्याकडे मोबाईल नसल्याने त्याने माझ्याच मोबाईल नंबरचा वापर करुन नोंदणी केली होती. दोन दिवसांपूर्वी त्याने त्याची लस घेतली. मात्र माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट येणे बाकी असल्याने मला लस घेता आली नव्हती. मात्र अचानक आम्हा दोघांचेही लसीकरण झाल्याचे मेसेज मला प्राप्त झाले. तसेच ऑनलाईन प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील आली. अनेक वयोवृद्ध नागरिकांकडे मोबाईल नसतात, त्यामुळे नातेवाईंकांच्या मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने लसीकरण न करता प्रमाणपत्र मिळणे चुकीचे आहे." अशी प्रतिक्रिया दाराशा रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या सुनील धुसर यांनी दिली.
दरम्यान "कोविन अॅपवर माहिती देताना स्वत:चे पूर्ण नाव आणि स्वतंत्र मोबाईल नंबर द्यायला हवे. बऱ्याच वेळा घरातील एकाच नंबरवरुन अनेकांची नोंदणी केली जात आहे. ज्यावेळेस मोबाईल नंबरद्वारे सर्च केले जाते आणि संबंधित व्यक्तीने नीट माहिती न दिल्यास दुसऱ्याचे प्रमाणपत्र जाऊ शकते. मात्र या प्रकरणांमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेतली जाईल. पालिका कर्मचाऱ्यांनी यामध्ये चुक केली असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल." अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. दरम्यान लसीकरण करण्यासाठी नोंदणी करताना स्वतंत्र मोबाईल नंबर देण्यात यावेत. मात्र नेमकं काय घडलय याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.