(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रत्नागिरी येथे निकृष्ट धान्य पुरवठा करणारे गोडाऊन FDAकडून सील; रात्री उशिरा कारवाई
रत्नागिरी येथील गरोदर महिला आणि लहान बालकांना धान्य पुरवठा करणारे मिरजोळे येथील गोडाऊन अन्न आणि औषध प्रशासनानं सील केले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, देवरूख आणि संगमेश्वर या ठिकाणी गरोदर महिला आणि लहान बालकांना धान्य पुरवठा करणारे मिरजोळे येथील गोडाऊन अन्न आणि औषध प्रशासनानं सील केले आहे. रात्री उशिरा अडीच वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणीहून पुरवठा केले जाणारे धान्य हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे रत्नागिरी येथील भाजप युवा मोर्चानं या ठिकाणी धडक दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी असलेले धान्य कशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे आहे. जोवर संबंधितांबाबत कोणताही कारवाई होत नाही. गोडाऊन सील होत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा अडीच वाजता अन्न आणि औषध प्रशासनानं गोडाऊन सील केले आहे. यामध्ये डाळ, तिखट, गहू, हरभरा यांचा समावेश आहे. ज्यावेळी भाजपच युवा कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले तेव्हा या ठिकाणचे मॅनेजर आणि कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 2 तासानंतर या ठिकाणी अधिकारी दाखल झाले. त्यांनी संबंधितांवर कारवाई करू असं आश्वासन दिलं. पण, गोडाऊन सील झालंच पाहिजे अशी भूमिका या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत हा धान्य पुरवठा केला जात होता. दरम्यान, अशाप्रकारे जिल्ह्यातील निकृष्ट धान्याची ही परिस्थिती काही पाहिलीच नाही आहे. यापूर्वी देखील चिपळूण येथील खडपोली एमआयडीसी येथे अशाच प्रकारची घटना समोर आली होती. या ठिकाणच्या धान्याला वास येत होता. याप्रश्नावर देखील भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती.
काय होती गोडाऊनमधील परिस्थिती?
भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्याच्यासोबत होते. दरम्यान, गहू आणि चणे यांचा दर्जा हा खालावलेला होता. ते साफ करत पिशव्यांमध्ये सीलबंद केले जात होते. शिवाय, या ठिकाणी असलेल्या डाळीमध्ये टोक नावाचा किटक दिसून आला. तसेच, रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसी येथे सील बंद होत असलेल्या पिशवीवर मुंबई आणि चिपळूणचा पत्ता दिसून येत होता. हे धान्य तीन महिन्यात वापरणं बंधनकारक आहे. पण, यातील निम्म्या अधिक पिशव्यांवर त्याबाबतच्या तारखेचा कोणताही उल्लेख दिसून आला नाही. या साऱ्या स्थितीबाबत अधिक विचारले असता या ठिकाणच्या मॅनेजर आणि कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. शिवाय, तुमच्या मुख्य व्यक्तिला बोलवा असं सांगितल्यानंतर ते येत आहेत असं सांगत मध्यरात्र उलटली. या साऱ्यामुळे भाजपनं कारवाई होत नाही तोवर या ठिकाणाहून न हटण्याचा निर्णय घेतला. तसेच बाजुचं गोडाऊन उघडण्यासाठी देखील यावेळी कर्मचारी आणि मॅनेजर यांनी टाळाटाळ केली.
2 तासानंतर पोलीस, अधिकारी म्हणतात गोडाऊनचा पत्ता माहित नाही!
या साऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी भाजप युवाचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान दाखल झाले. त्यानंतर जवळपास अडीच तासानंतर पोलीस दाखल झाले. हा सारा धान्य पुरवठा एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत होत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील बोलावले गेले. पण, अधिकाऱ्यांनी मात्र या ठिकाणी गोडाऊन कुठे आहे? असा सवाल केला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या उत्तराबाबत देखील आश्चर्य केले जात आहे. अखेर भाजप युवा कार्यकर्त्यांच्या साथीनं संबंधित अधिकारी रमेश काटकर जवळपास तीनतासानंतर या ठिकाणी पोहोचले. यावेळी बोलताना त्यांनी 'आम्ही नमुने घेतले आहेत. कारवाई करू' असं आश्वासन दिलं. पण, गोडाऊन सील केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप युवा कार्यकर्त्यांमुळे रात्री अडीच वाजता हे गोडाऊन सील केले गेले.
'शिवसेना नगरसेविकेचं कंत्राट'
याबाबत कठोर कारवाई व्हावी. हजारो टन धान्य निकृष्ट असून वर्षाचं 22 कोटींचं हे टेंडर आहे. यामध्ये शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका संजना घाडी यांचं देखील कंत्राट असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चानं केला आहे.