पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
भंडारा जिल्ह्यात सुमारे 5 हजार कुटुंब बाधित असून, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत. गोंदियात 40 गावे बाधित आहेत. गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबई : विदर्भ विशेषत: पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उदभवली आहे. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते 36 तासांनी पोहोचते. वेळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असते. पण, तसे न केल्याने नदीकिनारी राहणार्या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात सुमारे 5 हजार कुटुंब बाधित असून, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत. गोंदियात 40 गावे बाधित आहेत. गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आता तरी मदतीसंदर्भात राज्य सरकारने त्वरित पुढाकार घेतला पाहिजे.
एनडीआरएफची मदत वेळीच घेता आली असती, पण त्यालाही विलंब लागला. आता राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून वेळीच मदत करावी. मदतीसंदर्भात कोल्हापूरच्या पुराच्या धर्तीवर स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी राज्य सरकारकडे मागणी आहे.
Maharashtra Floods | नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीमधील पूर परिस्थितीचा आढावा