Driving License : आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, परिवहन विभागाची लवकरच नवीन संकल्पना
शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी ( learning license) परिवहन विभागाकडून घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडे आधार असणे गरजेचे आहे.
![Driving License : आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, परिवहन विभागाची लवकरच नवीन संकल्पना Get your learning license at home now a new concept from the Department of Transportation soon Driving License : आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, परिवहन विभागाची लवकरच नवीन संकल्पना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/31/3fbc21913d5638c7a9e3eea279900668_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी आरटीओत जाऊन परीक्षा द्याावी लागते. मात्र आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार जोडणी महत्त्वाची असून कोणतीही अपॉईंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल. ती पूर्ण करुन परीक्षा देणे शक्य होणार आहे. ही नवीन संकल्पना राज्याच्या परिवहन विभागाकडून लवकरच आणली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठीच्या आरटीओतील खेपा देखील टळणार आहेत. लवकरच या सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
राज्यात दर दिवशी वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे शिकाऊ लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. शिकाऊ लायसन्ससाठी अनेक खटाटोप करावे लागतात. परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करताना माहिती भरावी लागते. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून उपलब्ध सत्रानुसार अपॉईंटमेंट दिली जाते. कधीकधी या परीक्षेची तारीख लवकरच मिळते, नाहीतर कधी किमान एक महिना तरी प्रतिक्षा करावी लागते. हा खटाटोप टाळण्यासाठी किंवा अपॉईंटमेंट लवकरच मिळवण्यासाठी काही जण एजंटचीही मदत घेतात. त्यानंतर परीक्षा पास होणाऱ्यांना आरटीओकडून लायसन्स उपलब्ध होते.
हा सर्व खटाटोप टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडे आधार असणे गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहनच्या parivahan.gov.in या संकेतस्थळावर लायसन्स सुविधा उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक एन्टर केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करु शकेल. अर्ज प्रक्रिया पार पाडताच त्याला शुल्क भरावे लागेल आणि रस्ते सुरक्षेचा एक व्हिडीओ येईल. तो पाहिल्यानंतर पुढील प्रक्रियेत त्याला परीक्षा द्याावी लागणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
परीक्षार्थीलाच काढावी लागणार प्रिंट
परीक्षा दिल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीला परीक्षा पास झाल्याचे ऑनलाईन समजेल. तसेच मोबाईलवर संदेशही येईल. त्याचवेळी पास झालेल्यांना ऑनलाईन शिकाऊ लायसन्स उपलब्ध होणार आहे. त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी लागेल.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले, शिकाऊ लायसन्ससाठी घरात बसून ऑनलाईनही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे आरटीओत येण्याची गरज लागणार नाही. ही नवीन योजना एका आठवड्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु आरटीओत येऊनही परीक्षा देण्याचा पर्यायही कायम राहणार आहे. परिवहनच्या संकेतस्थळावर परीक्षार्थींचे आधार लिंक न झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास ती व्यक्तीला अपाईंटमेंट घेऊन आरटीओत जाऊन परीक्षा देता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)