(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sheetal Amte-Karajgi Birthday: ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनी तुझा विश्वासघात केला.... गौतम करजगी यांची भावनिक पोस्ट
डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte-Karajgi) यांच्या 40 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे पती गौतम करजगी (Gautam Karajgi) यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. सोबत त्यानी शीतल आमटेंच्या कार्याचा आढावा घेणारा एक व्हिडीओही शेअर केलाय.
मुंबई: आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या हा केवळ आनंदवनासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी धक्का होता. त्यांच्या आत्महत्येच्या आधी काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद सुरु होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर 13 दिवस पूर्ण होताच त्यांचे पती गौतम करजगी आणि सहा वर्षाचा मुलगा शर्विल यांनी आनंदवन सोडलं आणि ते पुण्याला रवाना झाले. डॉ. शीतल आमटे यांचा 26 जानेवारीला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केलीय. त्याचसोबत त्यांनी शीतल आमटेंचा एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये शीतल आमटेंचा लहानपणापासूनचा प्रवास मांडलाय. यामध्ये शीतल आमटे या बाबा आमटेंच्या सोबत दिसत आहेत. या माध्यमातून शीतल आमटेंच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
गौतम करजगी यांची फेसबुक पोस्ट त्यांच्याच शब्दात...
प्रिय शीतल (सोना), आज तुझा 40 वा वाढदिवस ! आता तू माझ्यापासून खूपच दूर गेली आहेस, पण खूप जवळ आहेस असा भास होतोय, मला तुला मिठीत घ्यायचं आहे पण प्रिय, मला अशा प्रकारे तुला शुभेच्छा द्याव्या लागतील अशी मी कल्पनाही केली नव्हती. तू माझ्या सोबत नाहीस यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. वयाच्या चाळीशीनंतर आपण आपलं जीवन कशा प्रकारे व्यतीत करायचं याच्या अनेक योजना बनवल्या होत्या. तु नेहमी म्हणायचीस की आयुष्यामध्ये वर्षांची भर घालण्यापेक्षा या वर्षांमध्ये आयुष्याची भर घालणे हे अधिक महत्वाचे आहे. शीतल, तू माझ्या आयुष्यातील चमकता तारा आहेस आणि यापुढेही राहशील. मला तू आनंदवनाची ओळख करुन दिलीस आणि खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं ते सांगितलंस. तू एक उत्कृष्ट मुलगी, मित्र, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. तू बाबा आमटे आणि ताईंच्या तत्वांची खरी अनुयायी होतीस. ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला याची मला सल आहे. तुझ्यापासून सुटका करण्यात ते यशस्वी झालेत पण ते तुझ्यापासून आनंदवनाला बाजूला काढू शकणार नाहीत. आनंदवनात बाबा आणि ताईंच्या नंतरची जागा तू कमावली आहेस. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त मी तुला वचन देतो की, तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलला वाढवीन, त्याचं संगोपन करेन.. जीवन जगताना तू ज्या मूल्यांचं जतन केलंस ती मूल्ये त्याच्यातही उतरतील याची काळजी घेईन. मला आशा आहे की तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील ज्यांना आपल्या मुलीबद्दल काळजी आहे, आणि तुला तुझ्या आई-वडिलांकडून अपेक्षित सर्व प्रेम आणि माया मिळेल. मी तुझी सदैव वाट पाहीन.. तुझाच, गौतम.पहा व्हिडीओ: ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनी तुझा विश्वासघात केला.... गौतम करजगी यांची भावनिक पोस्ट
शीतल आमटेंचा मृत्यू श्वास रोखल्यामुळं, शवविच्छेदन अहवालात प्राथमिक अंदाज