शीतल आमटेंचा मृत्यू श्वास रोखल्यामुळं, शवविच्छेदन अहवालात प्राथमिक अंदाज
डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर तब्बल एक महिन्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेवून आतापर्यंतच्या तपासातील बाबी समोर ठेवल्या आहेत.
चंद्रपूर : आनंदवनच्या CEO डॉ. शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष असल्याची चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी माहिती दिली आहे. यासोबतच डॉ.शीतल यांचा मृत्यू प्राथमिकदृष्ट्या घातपात वाटत नसल्याचं मत देखील पोलिसांनी व्यक्त केलंय.
डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर तब्बल एक महिन्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेवून आतापर्यंतच्या तपासातील बाबी समोर ठेवल्या. पोलीस तपासात डॉ. शीतल आमटे मानसिक तणावात असल्याचे आणि त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार घेत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. या दरम्यान त्यांनी जून 2020 मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांना नागपूरच्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
डॉ.शीतल यांच्या मृतदेहाशेजारी आढळलेल्या इंजेक्शनबाबत देखील पोलिसांनी महत्वाचा खुलासा केलाय. अल्सर झालेल्या कुत्र्यांना संपविण्यासाठी डॉ. शीतल यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले होते आणि त्यातील एक रिकामे अँपुल मृतदेहाशेजारी मिळाले होते. मात्र हेच इंजेक्शन घेवून त्यांनी आत्महत्या केली का याबाबतचा खुलासा व्हिसेरा अहवाल मिळाल्यावरच होऊ शकेल. यासोबतच टॅब-मोबाईल आणि लॅपटॉप यांचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्रलंबित असून तो लवकर मिळावा यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहे.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.