शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून आठवणींना उजाळा
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी देशमुख यांना श्रद्धाजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला लोकप्रतिनिधी : शरद पवार
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! अशी श्रद्धांजली शरद पवार यांनी वाहिली आहे.
गणपतराव देशमुख आपल्या सोलापूर जिल्हdयाचे वैभव होतं : सुशीलकुमार शिंदे
गणपतराव देशमुख आपल्या सोलापूर जिल्हdयाचे वैभव होतं. आमदार म्हणून निवडुन आल्यानंतर समाजाचे प्रश्न मोठ्या हिरीरीने ते सभागृहामध्ये मांडत. विषेशतः दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासाठी ते पोटतिडकीने भांडत असत. मी आमदार होण्याच्या आगोदर 12 वर्ष महाराष्ट्राच्या सभागृहात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना पहातोय. मी 1974 मध्ये आमदार झालो तेव्हापासून मी त्यांना अतिशय जवळुन पाहिलं आहे. जवळजवळ 11 वेळेस ते आमदार म्हणून त्यांनी सभागृहात आपल्या भागाचा नेतृत्व केलंय. मी एकदा प्रचाराकरिता सांगोल्याला गेलो होतो आणि त्यावेळेस माझे भांबुरे नावाचे साहायक निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की हा तुमच्या पक्षाच्या उमेदवार आहे, तुम्ही माझ्या विरोधात पक्षाचा प्रचार करु शकता. असा दिलदारपणे सांगणारा आमदार क्वचितच!, अशा भावना ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या.
आमच्या पुलोद सरकारमध्ये ते शेतकी मंत्री होते. तेव्हा शरद पवार यांनी त्यांना इस्राईलमध्ये शेती बघण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या ड्रायव्हरकरिता एक घड्याळ घेतले आणि मुंबईत आल्यावर त्यांना दिलं. गरीब माणसाची आठवण ठेऊन त्याला देखील आपल्या कुटुंबातीलच एक असे समजुन सारखी वागणुक देणारा आमदार विरळाच! मी आत्ताच सोलापूरमध्ये होतो. आठ दिवसांपुर्वी त्यांना आश्विनी हॉस्पीटलमध्ये भरती केलं होते. ऑपरेशन झाले होते. सुखरुप घरी या अशा शुभेच्छा देऊन आलो होतो, अशी आठवणही शिंदे यांनी सांगितली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली
"राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला : अजित पवार
“ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : फडणवीस
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.
इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा भावना विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.