Gadchiroli Naxal : गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान, दोघांवर 14 लाखांचे होते बक्षीस
Gadchiroli Naxal : गडचिरोली जिल्ह्यातील मोरचूल जंगलात झालेल्या चकमकीत टिपागड दलमच्या दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मोरचूल जंगलात झालेल्या चकमकीत टिपागड दलमच्या दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव पोलीस ठाणे हद्दीतील मोरचूल जंगलात सकाळी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची ओळख पटली आहे. टिपागड दलमच्या दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे.
शासनाने या दोघांवर 14 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिला नक्षलीचा समावेश आहे. दोन्ही मृतदेह जिल्हा मुख्यालयी आणले गेले आहेत. कमिटी प्लॉटून क्रमांक 15चा कमांडर राजा ऊर्फ रामसाई नोहरु मडावी आणि रनिता ऊर्फ पुनिता चिपळुराम गावडे कसनसूर दलम सदस्य अशी मृतांची नावे आहेत.
यातील राजा मडावीवर हिंसक असे 44 गुन्हे दाखल होते तर त्याच्यावर 12 लाखांचे बक्षीस होते. तर रनितावर एकूण 9 गुन्हे दाखल असून तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते. चकमकीनंतर घटनास्थळी शोध अभियान राबविले असता बंदुका, रायफल, कुकर बॉंब, आयईडी अशी शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. चकमकीत आणखी काही नक्षली मारले गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.






















