Fuel Price Hike : आधीच दरवाढ त्यात अपुरा इंधन पुरवठा; राज्यातील खासगी पेट्रोल पंप बंद
Fuel Price Hike : राज्यातील खासगी पेट्रोल पंप मागील काही दिवसांपासून बंद आहेत. अमरावतीत मागील 15 दिवसांपासून पेट्रोल पंप बंद आहेत.
Fuel Price Hike : अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील खाजगी पेट्रोल पंपाना डिझेल-पेट्रोलचा पुरवठा बंद करण्यात आल्याने मागील 15 दिवसापासून हे सर्व पंप बंद पडले आहेत. मंगळवारी नागपूर येथे पेट्रोल पंप संचालक आणि पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 24 तासांचा वेळ देण्यात यावा अशी मागणी पुरवठा कंपनीकडून करण्यात आली. घाऊक ग्राहकांसाठी इंधन दरात कंपन्यांनी दरवाढ केली होती. डिझेलच्या दरात जवळपास 25 रुपयांनी दरवाढ झाली. त्या तुलनेत किरकोळ ग्राहकांसाठी इंधन दरात वाढ झाली नव्हती.
अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 35 खाजगी पेट्रोल पंप असून संपूर्ण राज्यात ही संख्या अंदाजे 600 च्या वर आहे. या पेट्रोल पंप मालकांनी आपल्याला इंधनाचा पुरवठा व्हावा यासाठी आगाऊ रक्कमदेखील तेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहे. मात्र, अद्यापही पंपाना इंधन पुरवठा करण्यात आला नसून ते सर्व टँकर होल्डवर ठेवण्यात आले आहेत. तर, काही टँकर रिकामेच परत पाठविण्यात आले. इंधनाचा पुरवठा होत नसल्याने पेट्रोल टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खाजगी पेट्रोल पंप संचालकांना मागील 10 ते 15 दिवसांपासून पेट्रोल पुरवठा होत नसल्याने पंप बंद पडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत असून अमरावती जिल्ह्यात पेट्रोलचे दर हे 115 रुपयांपर्यंत पोचले आहे. तर, डिझेल 95 प्रति लिटर इतके वाढले आहेत. अमरावती जिल्ह्यात इसार (नायरा), रिलायन्स या खाजगी कंपन्यांचे पेट्रोल पंप असुन इंधन पुरवठा नसल्याने हे सर्व पंप बंद पडले आहेत.
2008 मध्ये पेट्रोल पंप झाले होते बंद
सन 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 150 बॅरल प्रति लिटर इतके झाले होते. त्यावेळेस रिलायन्सने पेट्रोल पंप बंद केले होते. रिलायन्स सरकारी इंधन कंपन्यांप्रमाणे अनुदानित दरात इंधन विक्री करू शकत नाही. सरकारी कंपन्यांना सरकारकडून अनुदान दिले जाते. रिलायन्सने काही दिवसांपासून डिलरांसाठीच्या डिझेलचा पुरवठा कमी केला होता.
IOC, BPCL, HPCL कंपन्यांचे 19,000 कोटींचे नुकसान
गेल्या पाच महिन्यांमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. त्यामुळे IOC, BPCL, HPCL या देशातील टॉप तीन पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल 19 हजार कोटी रुपयांना सामोरं जावं लागलं असल्याचं मूडीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे. बाजारातील सध्याची स्थिती पाहता पेट्रोलियम वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर दररोज 25 डॉलर प्रति बॅरेल आणि डिझेलच्या किंमतीवर 24 डॉलर प्रतिबॅरेल नुकसान होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Fuel Price Hike : ...तर, रिलायन्सच्या पेट्रोल पंपला पुन्हा टाळं लागणार, जाणून घ्या कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha