एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात पेट्रोल 17 रुपयांपर्यंत स्वस्त
राज्यातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल चार ते 17 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे ग्राहक सीमेच्या पलीकडे जाऊन पेट्रोल भरत आहेत.
मुंबई : देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पण राज्यातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल चार ते 17 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे ग्राहक सीमेच्या पलीकडे जाऊन पेट्रोल भरत आहेत.
महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड जिल्ह्यातील सीमेवर मिळतं. धर्माबाद हा नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तालुका आहे. इथून अगदी पाच किमीवर तेलंगणा राज्यातील पेट्रोल पंप आहे. एबीपी माझाने दोन राज्यातील इंधन दरांचा आढावा घेतला. धर्माबाद या शहरात पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लिटर 92 रुपये 29 पैसे एवढा आहे.
सीमावर्ती धर्माबाद येथील इंधन दराचा आढावा घेऊन आम्ही तेलंगणात पोहोचलो. तेलंगणातील बासर इथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर 88 रुपये 48 पैसे होता. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा सुमारे चार रुपये प्रति लिटरने इथे पेट्रोल स्वस्त आहे. विशेष म्हणजे इथल्या पंपावर आम्हाला महाराष्ट्रातील गाड्यांची गर्दी जास्त दिसली. लिटरमागे चार रुपयांची बचत होत असल्याने सीमा भागातील लोक तेलंगणात येऊन पेट्रोल भारतात.
गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा 9 ते 10 रुपयांनी स्वस्त
राज्यात जरी पेट्रोल 92 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त दराने मिळत असलं, तरी शेजारील राज्य गुजरातमध्ये पेट्रोल 82 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यापासून अवघ्या 22 किमी अंतरावर तब्बल दहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळत असल्याने ग्राहक गुजरातच्या सीमेत जाऊन पेट्रोल भरणं पसंत करतात.
महाराष्ट्रातील नंदुरबारचा भाव आहे 91 रुपये 40 पैसे. गुजरात राज्यात भाव आहे 82 रुपये 72 पैसे. म्हणजेच महाराष्ट्र तब्बल नऊ रुपये जास्त कर आकाराला जातोय. यामध्ये दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय.
गोव्यात पेट्रोल 75 रुपये प्रति लिटर
शेजारचं राज्य गोव्यात 75 रुपये प्रति लिटरने मिळणारं पेट्रोल महाराष्ट्रात 91 रुपयांपेक्षा जास्त दराने मिळत आहे. सर्वात स्वस्त पेट्रोल असणारं गोवा देशातलं दुसरं राज्य आहे. पहिल्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबारचा क्रमांक लागतो.
गोव्यात सध्या पेट्रोलचे दर 75.79 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 75.27 रुपये प्रति लिटर आहे. गोव्यापासून केवळ 60 किमी अंतरावर असलेल्या सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल 91.89 रुपये प्रति लिटरने मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement