शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला (Fruits and vegetables) गोव्यातील (GOA) विक्री केंद्राला लिंक होणार आहे.
Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला (Fruits and vegetables) गोव्यातील (GOA) विक्री केंद्राला लिंक होणार आहे. याबाबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी आश्वासन दिले आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार परमेंद्र शेट यांनी फळे व भाजीपाला सप्लाय करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
गोव्यात ग्राहकांना माफक किमतीत भाजीपाला व फळे देण्याचा उपक्रम
फळे व भाजीपाला पुरवठा करण्याबाबतच्या अडचणीबाबत ही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाजीपाला पुरवठा करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला. गोवा सरकार दीड हजार आउटलेटच्या (विक्री केंद्र) माध्यमातून ग्राहकांना माफक किमतीत भाजीपाला व फळे देण्याचा उपक्रम राबवीत आहे. फळे व भाजीपाला विक्री केंद्राचा उपक्रम देशात फक्त गोवा राज्यातच राबवला जात आहे.
गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं केली चर्चा
गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील कृषीभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. सदर शिष्टमंडळात कृषीभूषण अंकुश पडवळे यांच्यासोबत उपसरपंच प्रकाश भोसले, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन जयराम आलदर, दूध संस्थेचे चेअरमन भगवानराव चौगुले, माजी सरपंच संतोष वाले आदी सहभागी होते. सोलापूरच्या शेतकरी शिष्टमंडळाने फळे व भाजीपाला सप्लाय करण्याबाबत सविस्तर माहिती घेतली. शेतकरी शिष्टमंडळाने गोवा सरकारच्या गोव्यातील फळे व भाजीपाला 20 विक्री केंद्रांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली.
शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार : कृषीभूषण अंकुश पडवळे
गोवा सरकारनं फळे आणि भाजीपाली विक्री केंद्र सुरु केली आहेत. हे देशासाठी आदर्श विक्री मॉडेल असल्याची माहिती कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी दिली. आता महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहेत, यातचा शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. गोवा सरकारला गरजेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला घेता येतील. याबाबतची बोलणी सकारात्मक झाल्याचे पडवळे म्हणाले. यामध्ये शेतकऱ्यांनी बाजार समित्यांपेक्षा देखील चांगला बाजारभाव मिळेल असं मत पडवळे यांनी व्यक्क केलं. यामाध्यमातून थेट सरकारशी व्यवहार होणार आहे. जर हे काम लवकर सुरु झालं तर गोवा सरकारकडून मागील तीन वर्षाचे बाजारभाव घेऊन मल्टीक्रॉपचं नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश पडवळे यांनी एबीपी माझाला दिली.
दरम्यान, या बैठकीत गोवा कृषी विभागाचे संचालक संदीप देसाई, गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई, व्यवस्थापक प्रसाद परब आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या: