बुलडाण्यात नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू
चिखली शहरातील सैलानीनगर भागात राहणारे चौघे जण रविवारी सकाळी पोहण्यासाठी जामवंती नदीकडे गेले होते. मात्र नदीतील गाळात फसल्याने या मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत
बुलडाणा : बुलडाण्याच्या चिखली शहरातील जामवंती नदीच्या पात्रात बुडून चार तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पोहण्यासाठी गेलेली हे चारही तरुण दीड-दोन तासाच्या शोधकार्यानंतर मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
चिखली शहरातील सैलानीनगर भागात राहणारे चौघे जण रविवारी सकाळी पोहण्यासाठी जामवंती नदीकडे गेले होते. परंतु बराच वेळ झाला तरीही घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नदीपात्राकडे धाव घेतली. याठिकाणी कुणीही आढळून न आल्याने त्यांनी नदीच्या पात्रात शोधाशोध केली.
त्यावेळी दीड तासानंतर गाळात फसलेले चारही तरुणांचे मृतदेह तेथे आढळून आले. स्थानिकांच्या मदतीने चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सय्यद रिझवान सय्यद फिरोज, शेख साजिद शेख शफीक, वसिम शाह इरफान शाह आणि शेख तौफिक शेख रफिक अशी मृतांची नावं आहेत. मृत्यूमुखी पडलेले युवक 16 ते 20 वयोगटातील आहे.
मुलांचे मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. घटनास्थळी आणि चिखली ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी सध्या मोठी गर्दी केली होती. या चारही मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.