कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्यास नकार देणाऱ्या आठ आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
ज्या दवाखान्यांना कोविड हॉस्पिटल म्हणून परवानगी देण्यात आली आहे. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवित असेल तर त्यांच्यावर परवाना रद्दची कारवाई करावी लागेल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

सांगली : सांगलीच्या मिरजेत कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयातील आठ आरोग्य कर्मचाऱ्यां विरोधात 'मेस्मा " कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिरजेच्या महात्मा गांधी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात 'मेस्मा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यामुळे पालिकेकडून खाजगी रुग्णालयांमध्ये ही कोविड सेंटर निर्माण करण्यात आली आहेत. सांगली-मिरज रस्त्यावरील एक प्रसिद्ध खासगी रुग्णालयात सुद्धा कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कोवीड सेंटर याठिकाणी सुरू झाल्यापासून या खासगी हॉस्पिटल मधील आठ कर्मचारी हे ड्युटीवर हजर झाले नाहीत. हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना वारंवार याबाबत समज देण्यात आला होते,मात्र तरीही त्या कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला.
याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने सांगलीच्या जिल्हाधिकार्यांना याबाबतचा अहवाल पाठवला होता.तर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना याबाबतीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी करत त्या खासगी हॉस्पिटलमधील 8 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधात "महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005", ''भारतीय साथरोग नियमन अधिनियम 1987" आणि "महाराष्ट्र इसेन्शियल सर्विसेस ऍण्ड मेंटेनन्स ॲक्ट 2007" या तीन कायद्यान्वये मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी याबाबत बोलताना, कोरोनाच्या काळामध्ये कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथवा रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्यावर उपचार करण्यास असमर्थता दर्शवल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी 'त्या' हॉस्पिटलचा परवाना सुद्धा रद्द करण्यात येईल,असा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे
महापालिका क्षेत्रात कोविडसाठी अधिकृत करण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित रुग्णालायचा परवाना रद्द करू असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान मिरज येथील कोविड रुग्णालय सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील आठ जणांच्यावर मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Special Report | नागपुरात वैद्यकीय कचऱ्यांची विल्हेवाटाची सोय नसल्याचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
