जिथे वडिलांचा अपघाती मृत्यू, तिथेच मुलावरही काळाचा घाला
अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांच्या अपघाती मृत्यूला अवघे दहा महिने उलटत नाहीत, तोच त्याच चिंचोली फाटा परिसरात 19 वर्षीय मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील कोल्हार गावावर शोककळा पसरली आहे.
अहमदनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांच्या अपघाती मृत्यूला अवघे दहा महिने उलटत नाहीत, तोच त्याच चिंचोली फाटा परिसरात 19 वर्षीय मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील कोल्हार गावावर शोककळा पसरली आहे.
अहमदनगर मनमाड महामार्गावरील एक किमीच्या परिसरात हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असून रस्त्यावर पडलेले खड्डे व दुरावस्था अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
4 सप्टेंबर 2016 ला नगर-मनमाड महामार्गावर रामदास लोंढे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. वडिलांच्या अपघाती निधनानंतर मोठा मुलगा संतोष याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडल्याने त्यान महामार्गावरील हॉटेल न्यू प्रसादमध्ये काम करायला सुरवात केली. हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामास असलेल्या 19 वर्षीय संतोषचा पहाटेच्या सुमारास याच रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यानं जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
संतोष न्यू प्रसाद हॉटेलमध्ये वेटर होता. सोमवारी सकाळी हॉटेलला लागणारे इतर साहित्य घेऊन हॉटेलच्या दिशेला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव गाडीने संतोषच्या बाईकला जोराची धडक दिली. या धडकेत संतोष बाईकसह डिव्हाईडरवर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला असून रस्त्याची झालेली दुरावस्था या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संतोषचे वडील रामदास यांचा एक वर्षापूर्वी चिंचोली फाट्याजवळ याच हॉटेलजवळ अपघाताच मृत्यू झाला होता आणि काल पहाटेच्या सुमारास याच परिसरात संतोषचाही मृत्यू झाला. आता संतोषची आई आणि लहान भाऊ यांची जबाबदारी प्रशासन घेणार असा सवाल मयत संतोषचे काका आनंदा लोंढे यांनी केला आहे.
नगर मनमाड महामार्गाचे चौपदरीकरण झालेले असून टोल वसुलीही सुरु आहे. मात्र ठिकठिकाणी पडलेले खड्डे व रस्त्याची दुरावस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वास्तविक टोल घेणाऱ्या कंपनीने रस्त्याची देखभाल करणे गरजेचे असून प्रशासनाच मात्र याकड दुलर्क्ष झालंय हे मात्र नक्की.