नांदेडमध्ये स्वतः सरण रचून शेतकऱ्याची आत्महत्या
गंभीर दुष्काळग्रस्तांच्या यादीतील उमरी तालुक्यातील तुराटी गावात ही घटना घडली आहे. सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदतीची काहीच घोषणा केली नाही.

नांदेड : नांदेडमधील एका शेतकऱ्यानं स्वत:चं सरण रचत पेटत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोतन्ना बोलपीलवाड असं 60 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. गंभीर दुष्काळग्रस्तांच्या यादीतील उमरी तालुक्यातील तुराटी गावात ही घटना घडली आहे.
पोतन्ना हे यंदाच्या दुष्काळामुळे अडचणीत सापडले होते. बँकेचे लाखो रुपयाचं कर्ज फेडण्याच्या चिंतेत ते होते. त्यात नापिकी अशा दुहेरी संकटात ते सापडले होते. दिवाळी सणही नीट साजरा करता आला नसल्यानं नैराश्यात पोतन्ना यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा पोतन्ना यांनी स्वत:च्या शेतात सरण रचलं आणि पेटत्या चितेत उडी घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. सरकारनं दुष्काळ जाहीर करुनही अद्याप शेतकऱ्यांना मदतीची काहीच घोषणा केली नसल्यानं या घटनेतून समोरआलं आहे.
कोरडवाहू जमीन कसत पोतन्ना आपली उपजीविका कशीबशी करत होते. शेतीसाठी त्यांनी घेतलेले कर्ज सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत बसलं नाही आणि त्यांचं कर्ज माफ झालं नाही. त्यामुळे अखेरचा मार्ग म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याची बोललं जात आहे. पोतन्ना यांच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तहसीलदारांनी भेट देत घटनेची पूर्ण माहिती घेतली आहे.
सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदतीची काहीच घोषणा केली नाही. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा संयम सूटत चालल्याचे या घटनेवरून दिसून येते आहे.
संबंधित बातम्या
राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
महाराष्ट्रातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
