(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंना सध्या प्रसिद्धीची गरज; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा टोला
राज ठाकरे हे कायमच त्यांची वक्तव्य आणि विविध मुद्द्यांवरील त्यांच्या भूमिकांमुळं चर्चेचा विषय ठरतात. याचबाबत आता राष्ट्रवादीचे नेते म्हणतात....
बुलढाणा : वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी 2014 मध्ये मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीनही देण्यात आला. यानंतर राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली जिथं त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांच्याच शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरही त्यांनी वक्तव्य केलं.
शेतकरी आंदोलन (Farmers Protest) जरा जास्त चिघळलं आहे, जे होण्याची आवश्यकता नव्हती असं म्हणत कृषी कायद्यांमध्ये त्रुटी असू शकतात हे नाकारता येत नाही. पण, केंद्र सरकारनं राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे असा सूर त्यांनी आळवला. ठाकरे यांच्या कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबाबदच्या या भूमिकेमुळं अनेकांच्याच मनात संभ्रम पाहायला मिळाला. त्यांची कृषी काद्यांबाबची नेमकी भूमिका काय, ते कृषी कायद्यांचं समर्थन करत आहेत का, असा प्रश्न राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांना विचारण्यात आला, यावर त्यांनी सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे असा जोरदार टोला लगावला.
भाजपने विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेमध्ये होती; फडणवीस, अमित शाहंना रोहित पवारांचा टोला
पवारांच्या घरी अदानी आले आणि...
'सर्वात आधी मंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही वीज बिलांमध्ये कपात करु. त्यानंतर एकदम घुमजाव झालं. राज्यपालांनी सांगितल्यानंतर मी शरद पवारांशी बोललो. त्यांनी सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहा आणि ते पत्र माझ्याकडे पाठवा. मी त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी मला कळालं की, अदानी पवार साहेबांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्यानंतर सरकारनं निर्णय सांगितला की, वीज बिल माफ केलं जाणार नाही', असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यांची ही एकंदर वक्तव्य पाहता हे सारं प्रसिद्धीसाठी केलं जात असल्याचाच सूर पाटील यांनी आळवल्याचं पाहायला मिळालं.
'जिगाव या महत्वकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्री तातडीने बैठक घेणार'
बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम अगदी संथ गतीने सुरु आहे, आतापर्यंत 34 टक्के काम पूर्ण झालं आहे. शिवाय आताची अद्ययावत किंमत 13 हजार 875 कोटी रुपये झाली असून 4 हजार 568 कोटी रूपयांचं काम पूर्ण झालं असून, लवकरच जिगाव प्रकल्पाचं काम पुर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली जाईल असंही आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं.