'व्हॉट्सअॅप ग्रुप'च्या वाढदिवसाचा जंगी सोहळा; केक कापण्यासोबत, जेवणाच्याही पंगती, शेतकऱ्यांचा अनोखा उपक्रम
सध्या अनेकांच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन आला आणि त्यात प्रामुख्याने वाट्सअॅप असतंच, मात्र या वॉट्सअॅपवर क्षणातच अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यापैही काही माहिती किंवा पोस्ट या फेक असतात. मात्र वाशीमच्या शेतकऱ्यानं वॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल, हे दाखवून दिलं आहे.
वाशिम : आपण माणसांचे, प्राण्यांचे किंवा एखाद्या वस्तूचा वाढदिवस साजरा करताना अनेक वेळा पाहतो. मात्र वाशिम जिल्ह्यातील सुदी गावात शेतकऱ्यांनी वॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. आणि या ग्रुपचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी केकही कापण्यात आला तर, जेवणाची मेजवानी ही झाली.
सध्या अनेकांच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन आला आणि त्यात प्रामुख्याने वाट्सअॅप असतंच, मात्र या वॉट्सअॅपवर क्षणातच अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यापैही काही माहिती किंवा पोस्ट या फेक असतात. त्यांचा दुरुपयोग होताना दिसतो, मात्र वाशीमच्या सुदी गावातील विनोद भोयर या शेतकऱ्यानं वॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्याचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल, हे दाखवून दिलं आहे.या माध्यमातून व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये शेतकऱ्यांना शेतीबद्दल माहिती, त्यातून पीक पाणी फवारणी, पेरणी, बियाणं, खत याबद्दल विचार अदान प्रदान केले जातात. वाशिमच्या मालेगावच्या सुदी या छोट्या गावात साकारलेली ही संकल्पना हळूहळू सर्वांना आवडू लागली. या माध्यामातून एक, दोन, चार नाहीतर 35 ग्रुप निर्माण करून शेती विषयक माहिती दिली जाते. या ग्रुपचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एखाद्या माणसाच्या वाढदिवसाप्रमाणे केक कापला गेला आणि जेवणाची पंगत ही उठली. एवढंच नाहीतर छोट्या खाणी शेती पर्यावरण यावर मार्गदर्शन शिबीर हि झाले
हल्लीची तरुण पिढी म्हणजे, नोकरी किवां व्यवसायाकडे वळणारी. पण या ग्रुपच्या माध्यमातून कधी शेतीमध्ये रुची नसणारी तरुण पिढी शेतीकडे वळताना दिसली. ग्रुपमधून मिळणारी माहिती शेती कसण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. पेरणीपासून काढणी तंत्रज्ञान, जनावरं विकणं, कुक्कुटपालन शेळीपालन यासह इतर गोष्टींची देवाण घेवाण केली जाते.
हल्ली तरुण पिढी मोबाईलचा सदुपयोग म्हणून कमी तर दुरुपयोग म्हणून जास्त पाहते. तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे गैरप्रकारही केल्याचं अनेक घटनांवरून स्पष्ट झालं आहे. मात्र वाशिमच्या एका शेतकऱ्याने सुरु केलेला या उपक्रमाची गाव, तालुका नाही. तर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरही व्याप्ती वाढत आहे. आता या माध्यमातून युवा पिढी शेती व्यवसायात उतरण्यास भाग पडत आहे. हे ग्रुपने साध्य करून दाखवलं.