(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fact Check : मासिक पाळी दरम्यान लसीकरण करण्यास घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नका...
महिलांनी मासिक पाळी दरम्यान लसीकरण करण्यास घाबरू नये, असं आवाहन डॉक्टर धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी केलं आहे.
धुळे: देशात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतातर 1 मे पासून 18 वर्षावरील सगळ्यांना लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही समाजात लसीकरणाबाबत काही अफवा पसरत आहेत. यात एक अफवा आहे महिलांची मासिक पाळी आणि लसीकरणाबाबतची. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि मासिक पाळीच्या पाच दिवसनंतर महिलांनी लसीकरण करू नये अशा प्रकारचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. याबाबत कुठलाही गैरसमज महिलांनी करून घेऊ नये. लसीकरणाचा आणि मासिक पाळीचा कुठलाही संबंध नसून महिलांनी आपल्याला मिळालेल्या तारखेला लसीकरण करून घ्यावे व कोरोनापासून बचाव करावा असे आवाहन धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी केले आहे.
पल्लवी सापळे यांनी सांगितलेले चार महत्वाचे मुद्दे
1) कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीशी कुठलाही संबंध नाही
2) महिलांनी योग्य ती काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे
3) मासिक पाळीची सुरू असलेली औषधे बंद करू नये
4) समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये
काल 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. काल 66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात काल 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के झाले आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.