EVM मध्ये कोणतीही छेडछाड नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, 'या' जिल्ह्यातील यंत्राची केली तपासणी
ईव्हीएममध्ये (EVM) कुठलीही छेडछाड शक्य नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) देण्यात आलं आहे.

EVM News : ईव्हीएममध्ये (EVM) कुठलीही छेडछाड शक्य नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) देण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर आयोगाने तपासणी केली आहे. बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट स्लिपचीही तपासणी केली आहे. तिन्ही प्रकारात कुठलीही तफावत आढळली नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड, पुणे, यवतमाळ, नाशिक, कोल्हापूर, बीड मधील यंत्रांची तपासणी केली आहे. यामध्ये बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट स्लिपचीही तपासणी केली आहे. मात्र, यामध्ये कोणतीही तफावत आढळली नसल्याचे मत निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी
भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही. या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले.
ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही
काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला होता. या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले होते. महाविकास आघाडीला मोठा झटका बसला होता. महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशावर महाविकास आघाडीनं मोठी टीका केली होती. सर्वत्र ईव्हीएम हॅक केल्याच आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडूनही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray : मार्क मिळाले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एक नंबर! पण या शंभर मार्कांत तिने EVM वापरलं होतं का? उद्धव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका

























