Sanjay Shirsat on Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे देखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत : संजय शिरसाट
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray Interview : सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "उद्धव ठाकरे देखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत, शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही," असं शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray Interview : दैनिक 'सामना'चे कार्यकरी संपादक आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला. या मुलाखतीनंतर शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत मुलाखतीबाबत नाराजी व्यक्त केली. "उद्धव ठाकरे देखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत, शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही," असं म्हणत शिरसाट यांनी निशाणा साधला. "आमची हयात शिवसेनेत गेली असून आम्ही पालापाचोळा नाही," अशा शब्दात शिरसाट यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
'उद्धव ठाकरे देखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत'
माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावून मतं मागा. माझे वडील का चोरत आहात? बाळासाहेबांवरुन संभ्रम का निर्माण करत आहात, असं उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील मुलाखतीत म्हटलं होतं. यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, "उद्धव ठाकरे देखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत. आमचं काय घेऊन बसलाय, आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू इच्छितो. आम्हाला शिवसेनाप्रमुख होण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू, आमच्यासाठी ते पूज्यनीय, आदरनीय, वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल आमचं स्टेटमेंट कधीच नव्हतं. आमची लायकी आहे का शिवसेनाप्रमुख बनायची? शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुख होते. शिवसेनाप्रमुखांशी बरोबरी करणारे लोक आहोत का आम्ही? त्यांचे पाय धरुन आशीर्वाद घेता आले तरी ती आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुखांच्या समाधीला वंदन करण्यासाठी गेले. ही आमची निष्ठा आहे. आम्ही शिवसेनाप्रमुखांना कसं विसरु? एकवेळ तुम्हाला विसरु पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही."
शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही
"आज आम्ही आमदार, खासदार, मंत्री जे काही झालो आहोत शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळे, पुण्याईमुळे. त्यांना तुम्ही इतकं छोटं करण्याचा का प्रयत्न करत आहात? तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही स्वत:चा ठसा उमटवा ना. तुम्ही भाषणाची सुरुवात करता त्यावेळी पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचं घेता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं घेता नंतर शिवसेनाप्रमुखांचं नाव घेता. एका दर्जामध्ये वर गेलेल्या माणसाला खाली खेचायचं काम करु नका. शिवसेनाप्रमुखांनी असं कधीच केलं नाही. म्हणून शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. ही प्रत्येक शिवसैनिकाची दैवत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. शिवसैनिकाला खुजं करण्याचा प्रयत्न करु नका," असं आमदार शिरसाट म्हणाले.
पालापाचोळा कसं म्हणता?
'सामना'तील मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख सडलेली पानं, पालापाचोळा असा केला. यावरही आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. "पालापाचोळा कसं म्हणू शकता? सरपोतदार, लीलाधर ढाके, मनोहर जोशी, शरद आचार्य या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या सावलीत आम्ही वाढलो. शिवसेनाप्रमुख तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात फिरत नव्हते. पण या सर्व नेत्यांनी एकेका गावामध्ये, खेड्यामध्ये जाऊन शिवसेना रुजवण्याचं काम केलं. त्याला पालापाचोळा म्हणता येणार नाही.आम्ही पालापाचोळा नाही. आमच्या आयुष्यातील जे काही महत्त्वाचे दिवस होते ते आम्ही शिवसेनेत घालवले आहेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने ३८ वर्षे घालवलेली आहेत. आज आम्ही पालापाचोळा झालो? आजच्या घडीला आम्ही तुम्हाला पालापाचोळा वाटतो? उद्या जर तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवलं पाहिजे?"
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही? पाहा काय म्हणाले शिरसाट
संबंधित बातम्या
- Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव
- Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल