Nagpur News : संघ कार्यालयात जाऊनही अजित पवारांनी आद्य सरसंघचालकांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळलं, नेमकं कारण काय?
डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. मात्र संघ कार्यालयात जाऊनही अजित पवारांनी सरसंघचालकांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळलं आहे.
Nagpur News नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली. दोघांनी त्या ठिकाणी संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाला ही भेट देत वंदन केले. मात्र, संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळले आहे.
संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही अजित दादांनी समाधीचे दर्शन घेणे टाळले!
नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित झाल्या असून पेंडोलमध्ये बसायला जागा देखील शिल्लक नसल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वाहनांचे ताफा संघाच्या रेशीम बाग कार्यालयात उभा करण्यात आला होते. त्यामुळे आपल्या वाहनात बसण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संघ कार्यालयात पोहोचले, तेव्हा दोघांनी हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन केले. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काही क्षणापूर्वी अजित पवारही त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी रेशीमबाग येथील संघ कार्यालय परिसरात आले होते. मात्र त्यांनी समाधी स्थळाकडे जाणे टाळले असल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे.
अजित पवारांचा गेम वेगळा- जितेंद्र आव्हाड
तर दुसरीकडे याचं मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की,अजित पवारांचा गेम वेगळा आहे. ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस तसेच नितीन गडकरी यांना रोज भेटतात. त्यांची विचारसरणी ही आरएसएसची आहे. गडकरी हे मोठ्या अभिमानाने बोलतात की मी आरएसएसचा कार्यकर्ता आहे. त्यांना अजित पवार हे रोज भेटतात. मग हे नाटक कशाला करायचं? त्यांची भूमिका स्पष्ट असावी, पडद्यामागे एक आणि पुढे एक अशी नसावी, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा