(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दत्तजयंती असूनही अक्कलकोटमध्ये भाविकांना 'प्रवेश बंद'
दत्त जयंतीनिमित्त होणारी गर्दी आणि त्यातून उदभवणारं संकट पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
सोलापूर : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता याचा धोका आणखी बळावू नये यासाठी (Akkalkot) अक्कलकोटमध्ये भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. दत्त जयंतीनिमित्त होणारी गर्दी आणि त्यातून उदभवणारं संकट पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार, २८ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजल्यापासून ते ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही भाविक नागरिकांना अक्कलकोट शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
(swami samarth) स्वामी समर्थ समाधी ठिकाण, स्वामी समर्थ मंदीर आणि अन्नक्षेत्र या तिन्ही ठिकाणी विश्वस्त समिती मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या पालख्या, दिंड्या आणि भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश करण्यास मनाई आहे.
महसूल, पोलीस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांची वाहतूक, आपत्ती निवारण व्यवस्थापनमधील अधिकारी, कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र असेल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांकडून यंदाच्या वर्षी New Year पार्टीला परवानगी नाही
सलगच्या लागून आलेल्या सुट्ट्यांमुळं पर्यटनस्थळांसमवेत तीर्थक्षेत्रांकडेही अनेकांचेच पाय वळले आहेत. काही मंदिर प्रशासनांनी भाविकांची होणारी गर्दी पाहता मंदिरं जास्त वेळ सुरु ठेवण्याचा निर्णय़ घेण्यात आला. पण, अक्कलकोटमध्ये मात्र दत्तजयंती आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना शहर प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.