मुंबई पोलिसांकडून यंदाच्या वर्षी New Year पार्टीला परवानगी नाही
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही तर एखादी पार्टी करण्याच्या बेत आखत असाल आणि तिथं गर्दी होण्याची पुसटशीही कल्पना असेल तर, तुम्हाला पोलिसांच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
मुंबई : यंदाच्या वर्षाची सुरुवात कधी झाली आणि पाहता पाहता हे वर्ष संपायलाही कसं आलं याचा अनेकांनाच अंदाज आला नाही. (Coronavirus) कोरोना व्हायरसच्या विळख्यातच अर्ध्याहून अधिक वर्ष सरलं. आता सरत्या वर्षाला निरोप देत सकारात्मकतेनं आणि उत्साहानं नव्या वर्षाचं स्वागत करण्याकडेच अनेकांचा कल आहे. पण, त्यासाठीसुद्धा काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही तर एखादी पार्टी करण्याच्या बेतात असाल आणि तिथं गर्दी होण्याची पुसटशीही कल्पना असेल तर, तुम्हाला पोलिसांच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. कारण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी यंदाच्या वर्षी (New year) नवीन वर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टीला परवानगी नाकारली आहे. परिणामी यावर्षी कोणत्याही प्रकारच्या पार्टी दिसणार नाहीयेत. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक तत्त्वे आणि काही निर्बंध घातले आहेत.मुंबई पोलिसांचे डीसीपी एस चैतन्य म्हणाले की , "प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मुंबईत प्रचंड सार्वजनिक ठिकाणी गर्दी होतो, परंतु यावर्षी कोविड - 19 च्या निर्बंधामुळे हे शक्य होणार नाही. प्रथमच मुंबईत यावर्षी कोणत्याही प्रकारच्या पार्ट्यांना परवानगी नाही."
बरं यासोबतच छतावरील स्थान , टेरेस, बार, रेस्टॉरंट्स आणि समुद्रकिनारे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या पार्टीसाठीही पोलिसांना परवानगी नाकारली आहे.
डीसीपी एस चैतन्य यांनी निर्बंध आणि इतर मार्गदर्शक सूचनांचे स्पष्टीकरण देताना पुढे सांगितलं की, रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू आहे. त्या याव्यतिरिक्त कलम 144 ही लागू केलं आहे जेथे एका ठिकाणी 4 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. एका वाहनात फक्त 4 लोकांना परवानगी आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय ये- जा करू शकतात.
31 डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलिसांकडून रस्त्यावर जास्तीत जास्त पोलिस कर्मचारी तैनात असतील. कनिष्ठ पासून ते बरीच आयपीएस अधिकारी बंदोबस्ताच्या मार्गावर असतील. पोलीस स्टेशन आणि राखीव दलातील कर्मचाऱ्यांना या दिवसांत पोलीस दलाकडून तैनात केलं जाईल. एसआरपीएफ कडून अतिरिक्त दलही तैनात असतील. एसआरपीएफची 9 प्लाटून तैनात करण्यात येणार आहेत. 600 होमगार्ड्स बंदोबस्त ड्यूटीवर असतील. संवेदनशील ठिकाणी दंगल नियंत्रण पथकं तैनात करण्यात येतील. सर्व पोलिस ठाण्यातील अँटी टेरर सेलनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. मोक्याच्या ठिकाणी बॉम्ब पथक आणि 'डॉग स्क्वॉड' असतील. तर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'अँटी इव्ह टीझिंग' पथक महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार असून साध्या वेशभूषेत जास्तीत जास्त महिला अधिकारी असतील.
एकंदरच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस दलाकडून सर्वतोपरि प्रयत्न करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळंच नागरिकांवर यंत्रणांमुळं हे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळं नागरिकांनी यात सहकार्य करत संकटावर मात करण्यास हातभार लावण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे.