एक्स्प्लोर
यवतमाळमध्ये वाघिणीला पकडण्यासाठी आणलेल्या हत्तींची घरवापसी
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव परिसरातील वाघिणीला पकडण्यासाठी चार हत्तींना मध्य प्रदेशातून आणलं होतं. यामध्ये ताडोबातील एका हत्तीचाही समावेश होता. पण ताडोबातील हत्तीने एका महिलेचा जीव घेतल्यानंतर सर्व हत्तींची घरवापसी करण्यात आली आहे.
यवतमाळ : 13 जणांचा जीव घेऊनही मुक्तपणे वावर करणाऱ्या टी वन वाघिणीची यवतमाळ जिल्ह्यात सध्या दहशत आहे. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीच्या चमूची तिला जेरबंद न करताच घरवापसी करण्यात आली. कारण, साखळी तोडून पळालेल्या या हत्तीने एका महिलेचा जीव घेतला, तर एका पुरुषाला जखमी केलं.
पवनपुत्र, विजय, हिमालय आणि शिवा... मध्य प्रदेशच्या कान्हा जंगलात वास्तव्याला असणारे हे चौघे भाऊ काही दिवसांपासून विदर्भाचे अतिथी होते. एखाद्या वाघाला सर्व भावांनी मिळून घेरणे आणि जेरबंद करण्यात हे चार हत्ती पटाईत आहेत. त्यामुळेच यवतमाळच्या मारेगाव परिसरातील टी वन वाघिणीच्या दहशतीत जगणाऱ्या लोकांच्या मदतीला म्हणून त्यांना पाचारण करण्यात आलं. पण टी वन वाघिण हाती लागायच्या आतच या चौघांची घरवापसी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चौघांच्याही घरवापसीचं कारण ठरला आहे तो म्हणजे गजराज. गजराज हा ताडोबाच्या वन विभागाचा हत्ती... त्यालाही याच कामासाठी यवतमाळ जिल्ह्यात आणलं होतं. मात्र तीन दिवस आधी साखळी तोडून रात्रीतून पळालेल्या गजराजने नुसती नासधूसच केली नाही, तर एका महिलेचा जीव घेतला आणि एका व्यक्तीला जखमी केलं.
आता हत्तींना आपल्याबरोबर वागवण्याबाबतच वन खात्याच्या उरात धडकी भरली आहे. एकीकडे गजराजवर नियंत्रण मिळताच त्याला त्याच्या घरी ताडोबात पाठवलं आहे. पण त्याचबरोबर गृह विभागाने या चौघा भावांनाही कान्ह्याला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
टी वन वाघिणीने शेवटचा बळी ऑगस्ट अखेर घेतला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. पहिले पूर्ण प्रयत्न जेरबंद करण्याचे आणि अगदी नाहीच झालं, तरच मारणे अशा पद्धतीचा वन खात्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही उचलून धरला. मात्र आता हे हत्ती परत पाठवल्यामुळे टी वनला ट्रॅप करणं कठीण होऊन बसलं आहे.
थर्मल ड्रोनचा वापर करून टी वन वाघिणीचं नेमकं लोकेशन हे रात्रीच्या अंधारात घेतलं जाणार होतं. मात्र आता दरी, पाणी आणि उंच गवतात लपलेल्या वाघिणीला नक्की हत्तीविना कसं ट्रॅप करणार हा प्रश्न आहे. जेरबंद करणं जितकं कठीण आहे, तितकेच ती बंदुकीच्या निशाण्यावर कशी येणार हा प्रश्नही उद्भवतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement