अंबरनाथमध्ये विद्युत कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. सूर्यवंशी विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढले होते.
अंबरनाथ : विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. महेश सूर्यवंशी असं या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 29 वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. सूर्यवंशी आज सकाळी अंबरनाथ पश्चिम भागात बाजारपेठेत विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढले होते.
खांबावर चढण्यापूर्वी त्यांनी वीजपुरवठा बंद केला होता. मात्र यादरम्यान कुणीतरी जनरेटर सुरू केला आणि त्याचा रिव्हर्स करंट खांबापर्यंत आला. याचा जोरदार झटका बसल्याने सूर्यवंशी खाली कोसळले. सूर्यवंशी यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी पंपिंग करून सूर्यवंशी यांना वाचवण्याचे प्रयत्न केले.
त्यानंतर सूर्यवंशी यांना सोबतच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मात्र सूर्यवंशी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पुन्हा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र तिथेही डॉक्टरांनी सूर्यवंशी यांना मृत घोषित केलं.