Maharashtra Cabinet Exclusive : फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीत अजित 'दादा'- एकनाथ 'भाई' भिडले
Ajit Pawar Vs Eknath Shinde : नगरविकास खात्याच्या फाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांना भिडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असताना आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. या दोघांनीही घेतलेल्या भूमिकेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रीमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. आता त्यात अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धूसफूस बाहेर आल्याचं दिसतंय.
तुमच्या फाईलवर मी सही करणार नाही, एकनाथ शिंदेंची भूमिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नगरविकास खात्याच्या फाईलवरून ही खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असलेल्या नगरविकास खात्याची फाईल ही वाचल्याशिवाय त्यावर सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईल वरती मी सही करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
आयत्यावेळी विषय आला तर कसं करायचं?
आयत्यावेळी विषय आले तर कसं करायचं, किमान वाचायला वेळ मिळाला पाहिजे अशी अजित पवार यांनी भूमिका घेतली. तर तुमच्या आलेल्या फाईलवरती मी सह्या करत नाही का अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली. हा विषय ठरवून आयत्यावेळी आणला नाही तर तो अचानक समोर आल्याने विषय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
तानाजी सावंत अजितदादांवर भडकले (Eknath Shinde - Ajit Pawar Dispute)
हा वाद सुरू असताना शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांवर मोठा आरोप केला. माझ्या विभागाच्या फाईलवरती तुम्ही निर्णय का घेत नाही असं सांगत त्यांनी अजितदादांना टार्गेट केलं. ही फाईल माझ्या हिताची नसून लोकांच्या हिताची आहे असं सांगत तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.
एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री असा वाद सुरू होता. नंतर हा वाद मोठ्या आवाजात सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मिनिटांसाठी तणावपूर्ण वातावरण असल्याचं दिसून आलं.
हा विषय संपल्यानंतर मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावरून अजितदादांचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसतंय. त्यानंतर आता अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धूसफूस बाहेर आल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा :