(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde on Gayran Encrochment in kolhapur : 'गायरान' मुद्यावर धोरणात्मक निर्णय घेऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
'गायरान' जमिनीवर न्यायालयाने निर्णय दिला आहे, न्यायालयाकडून मुदतवाढ घेऊन गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Eknath Shinde on Gayran Encrochment in kolhapur : 'गायरान' जमिनीवर न्यायालयाने निर्णय दिला आहे, न्यायालयाकडून मुदतवाढ घेऊन गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयसिंगपुरात विक्रमसिंह मैदानावर आयोजित जनसंवाद यात्रेत बोलताना दिले. लोकांच्या प्रश्नासाठी न्यायालयाला विनंती करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या 30 के.एल.पी. डी. आसवणी (डिस्टिलरी) प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात जयसिंगपूर शहरातील नियमित केलेल्या झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील.
ते पुढे म्हणाले, गेल्या चार महिन्यांमध्ये सरकारने विकासाचे मोठे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला वेगळी आपुलकी असल्यानेच त्यांच्या विकासासाठी यापुढे निर्णय घेतले जातील. आमच्या शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत, गोगलगायमुळे नुकसान झालेल्या पिकांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले असून अजूनही पंचनामे सुरु आहेत. पंचनाम्यानंतर या शेतकऱ्यांनाही सरकार मदत करणार असून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
मी ही एक शेतकरी असून शेतकऱ्यांच्या कष्टाची, श्रमाची जाणीव असल्याने यावर्षीची दिवाळी शेतकऱ्यांसमवेत साजरी केली. लोकांमध्ये जावून त्यांची सुख दु:खे समजून घेण्यास आपणास आवडते. सर्व सामान्यांच्या मनात सरकार आपले आहे अशी भावना निर्माण झाली ही आमच्या सरकारच्या कामाची पोहच पावती आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. जिल्ह्याचा सर्वांगीन विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. शिरोळ तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिरोळ तालुक्यात नवीन एमआयडीसी सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.
इतर महत्वाच्या बातम्या