शिंदे सरकार 'महाराष्ट्र सल्लागार मंडळा'ची स्थापना करणार; आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागावर लक्ष केंद्रीत करणार
Eknath Shinde : महाराष्ट्र सल्लागार मंडळात आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागातील निवृत्त अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असणार आहे.
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने 'महाराष्ट्र सल्लागार मंडळा'ची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभाग डोळ्यासमोर ठेवून सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या सल्लागार मंडळात आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागातील निवृत्त अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र सल्लागार मंडळ हे राज्य सरकारला आरोग्य, शिक्षण आणि कृषी या तीन विभागाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार करणार आहे. हे मंडळ स्थापन झाल्यानंतर मंडळातील तज्ञ, मुख्यमंत्री आणि विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका होणार आहेत.
राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि कृषी या तीन क्षेत्रावर शिंदे सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
कृषी मंत्र्यांचा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम
राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेण्याकरता आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल यांनी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला आहे. यानिमित्ताने प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणार आहेत. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक आणि इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.