(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनामुळे गणेशोत्सवात दुमदुमणार नाहीत ढोल-ताशे; वादक आर्थिक संकटात
ढोलताशा पथकांसह राज्यातल्या कानाकोपऱ्यांत हजारो लेझीम, पारंपरिक वाद्यांची पथके कार्यरत आहेत. या साऱ्यांची उपजीविका या पथकांवर आहे. गणेशोत्सवामध्ये या पथकांना चांगली बिदागी मिळत असते. परंतु, कोरोनामुळे या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ढोलताशा, लेझीम पथकांचा रापता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रात साध्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये दणाणून सोडणार्या ढोल ताशांचा आवाज आपणास ऐकायला मिळणार नाही. सहाजिकच ढोल पथक, लेझीम पथकासह अन्य वाद्य वृंदांवर उपजीविका करणाऱ्या कलाकारांना याचा मोठा फटका बसणार आहे.
भारतात कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात सण समारंभ, उत्सव, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सवावर अनेक घटक अवलंबून असतात. यामध्ये श्री गणेशाची मूर्ती तयार करण्यापासून ते विसर्जनापर्यंत अनेक घटकांमार्फत वेगवेगळ्या सेवा आणि वस्तु पुरविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हा सण मंगलमय व्हावा यासाठी वाद्यवृंद, ढोल पथक, लेझीम पथक यांचा मोलाचा वाटा असतो. बाप्पांच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी वाजत गाजत श्रींची मिरवणूकही काढली जाते. मात्र यंदा संपूर्ण देशात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्यसरकारने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन जनतेला केले आहे. याला प्रतिसाद देत राज्यातल्या बहुतांश मंडळांनी मोठ्या गणेश मूर्ती रद्द करून शासनाच्या नियमाप्रमाणे चार फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या उत्सवामध्ये लोकांची गर्दी होऊ नये आणि पुन्हा कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ढोल ताशा पथक, लेझीम पथक यासह अन्य करमणुकीच्या पथकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे.
राज्यातील प्रसिद्ध ढोल ताशा पथक
1. नाशिक ढोल 2. पुणेरी ढोल ताशा पथक 3. डबेवाल्यांचे ढोल ताशा पथक 4. कोल्हापुरी लेझीम पथक 5. साताऱ्याचे ढोल पथक
या ढोलताशा पथकांसह राज्यातल्या कानाकोपऱ्यांत हजारो लेझीम, पारंपरिक वाद्यांची पथके कार्यरत आहेत. या साऱ्यांची उपजीविका या पथकांवर आहे. गणेशोत्सवामध्ये या पथकांना चांगली बिदागी मिळत असते. काही ढोल ताशे पथकं तर वर्षभर केवळ याच व्यवसायावर अवलंबून असतात. कोरोनामुळे या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर वर्षातील सर्वात मोठा असणारा उत्सवच साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे त्यांचा हा सिझन सुद्धा हातातून निघून जाणार आहे.
पाहा व्हिडीओ : यंदा लालबागच्या राजाचा गणपती नाही; कोरोनामुळे मंडळाचा ऐतिहासिक निर्णय निर्णय
'कोरोनामुळे मुंबई पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळे यावर्षी साधे पणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत. याचा फटका अनेक घटकांना बसणार आहे. तसाच तो डबेवालांच्या 'ढोल पथकांना' बसला आहे. मुंबईत डबेवाल्यांची अनेक ढोल पथके कार्यरत आहेत. ऐरवी मुंबई, पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव असला की, डबेवाल्यांच्या ढोल पथकांना चांगली बिदागी मिळते. पण ती बिदागी आता मिळणार नाही. पुणे जिल्ह्यातील मावळ पट्यात ढोल पथके मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या विशिष्ठ वाजवण्याच्या पध्दतीमुळे त्यांना पुणेरी ढोल म्हणतात. या पुणेरी ढोलांना गणपतीमध्ये मुंबई पुण्यात खुप मोठ्या प्रमाणात मागणी असते. या मागणीमुळे दोन तास वाजवण्याची 15/20 हजार रूपये बिदागी ढोल मंडळींस मिळत असे अशा प्रकारे प्रत्येक ढोल पथक लाखो रूपये कमाई होत असे. या कमाईला आता मुकावे लागणार आहे. सर्व अर्थाने कोरोनामुळे आर्थीक घडी पार विस्कटून गेली आहे.', अशी प्रतिक्रीया मुंबई डबेवाले असोसिएशनचे सदस्य सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : एक प्रभाग-एक गणपती संकल्पनेसाठी मुंबई महापालिका प्रशासनाचं आवाहन |स्पेशल रिपोर्ट
'गेली वीस वर्ष आम्ही पुणे आणि मुंबई इथं गणेशोत्सवामध्ये आमचं ढोल ताशा पथक घेऊन जातोय. आमच्या पथकाच्या विशिष्ट वाजवण्याची पद्धत पाहून अनेक गणेश मंडळ आम्हाला आमंत्रित करत असतात. सत्तर वादकांचा आमचा समूह आहे. वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला बोलावलं जातं. वर्षात गणेशोत्सव हा आमच्यासाठी पर्वणी असते. या काळात आम्ही चांगली कमाई देखील करतो. पण कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून आमच्या ढोल ताशा पथकाची तालीम आम्ही घेतलेली नाही . यंदा गणेशोत्सव बहुतांश ठिकाणी साध्या पद्धतीने करत असल्यामुळे या वर्षी आमच्या ढोल ताशा पथकाला सुपारी मिळेल असं वाटत नाही. अनेक तरुण ढोल-ताशा पथकावर आपली उपजीविका चालवत आहेत . गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा सिझन आहे. जर हातातून गेला तर पुन्हा वर्षभर उपासमारीची वेळ येणार आहे . त्यामुळे शासनाने अशा पथकांना देखील मदत करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो.' , अशी प्रतिक्रीया पुण्यातील भैरवनाथ ढोल मंडळाचे अध्यक्ष दत्ता निकम यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनामुळे यंदा बाप्पाला दागिन्यांचा साज नाही, बाप्पाचे सुवर्णालंकार घडवणारे कारागीर संकटात
एक प्रभाग-एक गणपती संकल्पनेसाठी मुंबई महापालिका प्रशासनाचं आवाहन
बाप्पांची उंची, कार्यकर्त्यांची संख्या किती असावी?, गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर