उत्तर भारतातील थंडीच्या लाटेनं राज्यात हुडहुडी, महाबळेश्वरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान शून्य अंशावर
राज्यातल्या अनेक भागात पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेनं राज्यात हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वर, धुळे, नंदूरबार, नाशिक या भागात कडाक्याची थंडी आहे.
सातारा : राज्यात चांगलाच गारठा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान शून्य अंशावर गेले आहे. वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली असून, महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना देखील या थंडीचा सामना करावा लागतोय. राज्यातल्या अनेक भागात पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेनं राज्यात हुडहुडी भरली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी कायम असून, आज शहरासह परिसरावर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच नंदूरबारमध्ये देखील पारा चांगलाच घसरला आहे.
उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सध्या राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे. साताऱ्यातील वेण्णा लेक परिसरात बुधवारी मध्यरात्री तापमान शून्य अंशांपर्यंत पोहोचले आहे. तर नाशिकमध्येसुद्धा पारा 10 अंशावर गेला आहे. निफाडमध्ये या पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. सातत्याने गारठा असल्यानं सकाळच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळत आहे. गोदावरी नदीवरील धार्मिक कार्य ही उशिराने सुरू होत आहेत. तसेच चहाच्या ठेल्यावर लोक गर्दी करत असल्याचे दिसत आहे.
नंदुरबारमधील थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या तोरणमाळमध्ये 7 अंश तापनाची नोंद झाली आहे. तर धुळ्यात 6.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकच्या निफाडमध्येही गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पारा 7 अंशांवर आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण भागावर थंडी पाहायला मिळत आहे. त्यात मिनी काश्मिर म्हणून जाणाऱ्या महाबळेश्वर वेण्णालेक मधील गेल्या तीन दिवसापासून तापमान मोठ्या प्रमाणात घसरल्याचा पाहायला मिळाले. महाबळेश्वर वेण्णालेकच्या परिसरामधील तापमान तब्बल 0 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. अनेक भागात बर्फाची चादर पाहायला मिळाली.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी कायम आहे. आज शहरासह परिसरावर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाढत्या थंडीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, यासोबतच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर देखील होणार आहे. मकरसंक्रांतीच्या सणानंतर थंडीचा कडाका कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे दरम्यान, सातपुड्याच्या दुर्गम भागात थंडीची लाट कायम असून, दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.