रत्नागिरी : दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली तरीही या महिन्यात पाण्याचा दुष्काळ पाहायला मिळतोय. गेली दोन वर्षे कोकणात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. कधी निसर्ग चक्रीवादळ तर कधी तोक्ते चक्रीवादळ यातूनच सुटणाऱ्या वाऱ्याने मुसळधार पाऊस कोकणात चांगलाच जोर धरतो. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे 22 जुलै 2021 रोजी कोकणात झालेली अतिवृष्टी. कोकणात सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातुन वाहणाऱ्या अनेक नद्यांना महापूर आला तर काही नद्यातुन दगडगोटे, माती वाहून आल्याने नद्यांनी आपले पात्र सोडून वाहू लागले. या नद्यांच्या शेजारी कोकणात राहती वस्ती असते. तेथेच वाडी वाडी मिळून गाव तयार होतो. अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त नदीकाठच्या गावांना बसला. वाहून आलेला गाळ आणि मातीमुळे नद्यांचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी आतापासुनच गावात पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला आहे. 


एबीपी माझाची टीम रत्नागिरी तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेले नांदीवसे गावातील गणेशपूर या ठिकाणी गेली असता तेथील सध्याची पाण्याची स्थिती काय आहे हे जाणून घेतली. गणेशपुर या गावची लोकसंख्या जवळपास 1500 आहे. या गावाच्या शेजारी वाहणारी वैतनगंगा ही नदी, तर दुसऱ्या बाजूला आकले गावची नदी या दोन्ही नद्यांचा संगम या गावात होतो. या दोन्ही नद्या वाशिष्टीच्या उपनद्या असून सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहतात. या दोन नद्यांच्या प्रवाह मार्गावर पंधरा गावे वसलेली आहेत. पण आज या नद्या कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे गावकरी चिंतेत पडले आहेत. पाण्याची पातळी खालवल्याने गावतील बोअरेवलला सुद्धा मुबलक पाणी मिळत नाही आहे. 

 

गावात नदीच्या पाण्यावर चालणाऱ्या नळपाणी योजना, विहिरी, बोअरवेल अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापूरात पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठीही गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. पाण्यासाठी वणवण पायपीट करावी लागत आहे. माझाची टीम गावकऱ्यांसोबत गावातील नद्यांची स्थिती पाहण्यासाठी नद्यांवर गेले असता, नदीचे कोरडे पात्र पाहायला मिळाले. नदीपात्रात कुठेही पाण्याचा साठा नाही हे निदर्शनात आले. वाहून आलेले दगड गोटे आणि गाळ यामुळे नदीपात्रात बदल झाला आहे. आज या कोरड्या नद्यामुळे गावकरी गाव सोडून निघाले आहेत. पुर्वी वाहणाऱ्या या नद्यांवर गावातील महिला बचत गट आपल्या शेतातुन भाजीपाला पिकवत असत. त्यातून त्यांना रोजगार मिळत होता पण आता पाणीच नसल्याने रोजगारही गेला.

 

एकीकडे गावागावांत कोरड्या नद्या असतांना दुसरीकडे मात्र पावसाळ्यात वाहणाऱ्या ओढ्यावर नैसर्गिक स्त्रोत शोधून गावकरी बंधारे बांधत आहेत. गुळवणे गावात शेकडो महिलांनी एकत्रित येउन वाहत्या पाण्यावर 10 बंधारे बांधले आहेत. गावागावात अशा प्रकारचे बंधारे बांधल्यास गावच्या पाण्याची समस्या दुर होऊ शकते. जिल्ह्यात मे महिन्या आधीच तालुक्यातील गावांत पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाला आता कंबर कसावी लागणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागांतही नद्यांचा गाळ काढावा लागणार आहे.

 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नळपाणी योजना एकूण 260 आहेत त्यापैकी सर्वात जास्त खेड तालुक्यात 156 तर चिपळूणमध्ये 45 नळपाणी योजना अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असतानाच  पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे आत्तापासुनच दुष्काळाच्या झळा गावकऱ्यांना बसत आहेत. पाण्याच्या दुष्काळामुळे गावकऱ्यांनी आपली गुरे-ढोरे विकायला काढली आहेत. त्यामुळे मे महिन्यात बसणाऱ्या पाण्याच्या दुष्काळाच्या झळा आत्तापासुनच बसू लागल्याने प्रशासनासमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha