Sharad Pawar on Wine sale in Supermarket : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नसून निर्णय बदलला तर वाईट वाटण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर भाष्य केले.  राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे शरद पवारांनी म्हटले. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले. 


शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन


शरद पवार पुढे म्हणाले की,  देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी म्हटले. 


केंद्र सरकारला किंमत मोजावी लागेल


गोविंदबागेत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबतही आपलं निरीक्षण सांगितले. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलनाला बसले होते. आंदोलनामुळे केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. पण त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याची किंमत भाजप सरकारला मोजावी लागणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha