Dr Kamal Ranadive 104 Birth Anniversary : मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवेंच्या जयंतीनिमित्त Googleकडून मानाचा मुजरा, बनवलं खास Doodle
Dr. Kamal Ranadive’s 104th Birthday: मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवे यांची आज 104वी जयंती. डॉ कमल रणदिवे यांच्या जयंतीनिमित्त आज Googleनं त्यांना अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा केला आहे.
Dr. Kamal Ranadive’s 104th Birthday: मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवे यांची आज 104वी जयंती. डॉ कमल रणदिवे यांच्या जयंतीनिमित्त आज Googleनं त्यांना अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा केला आहे. गुगलनं Doodle च्या माध्यमातून बायो मेडिकल संशोधक असलेल्या डॉ. कमल रणदिवे (Dr. Kamal Ranadive) यांच्या कामाची ओळख जगाला करुन दिली आहे. डॉ कमल रणदिवे यांचं कॅन्सरवरील संशोधन महत्वाचं ठरलं होतं. त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देत सन्मानित केलं आहे.
डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 साली पुण्यात झाला होता. त्यांचे वडील दिनकर दत्तात्रेय समर्थ आणि आई शांताबाई दिनकर समर्थ. वडील दिनकर पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कमल रणदिवे या पहिल्यापासून हुशार विद्यार्थीनी होत्या. आपलं शिक्षण फर्ग्यूसन कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालयातून एमएससी केली. त्यांनी 3 मे 1939 रोजी गणित तज्ञ जे. टी. रणदिवे यांच्याशी लग्न केलं. कमल रणदिवे यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम केलं. सोबतच त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी देखील घेतली.
डॉ. कमल रणदिवे या भारतीय महिला वैज्ञानिक संघ (IWSA) च्या संस्थापक सदस्य होत्या. कमल रणदिवे यांनी कॅन्सरवर अनेक संशोधनं केली. स्तन कॅन्सर आणि अनुवांशिकता यांचा परस्पर संबंध असल्याचा पहिला प्रस्ताव त्यांनी मांडला होता. याबाबत अनेक संशोधकांनी देखील दुजोरा दिला आहे.
1960च्या दशकात त्यांनी मुंबईत भारतीय कॅन्सर संशोधन केंद्रात भारतातील पहिली प्रयोगशाळा सुरु केली. त्यांचे मार्गदर्शक डॉ. वी. आर. खानोलकर हे भारतीय कॅन्सर संशोधन केंद्र (आयसीआरसी) चे संस्थापक होते. 1949 मध्ये पीएचडी केल्यानंतर कमल रणदिवे यांना खानोलकर यांनी अमेरिकेच्या विद्यापीठात फेलोशिपसाठी प्रोत्साहन देखील दिलं. या प्रयत्नाला यश देखील मिळालं. डॉ कमल रणदिवे यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप मिळाली आणि त्यांनी इनोव्हेशन लेबर सेल लाईनमधील प्रसिद्ध संशोधक जॉर्ज गे यांच्यासोबत बाल्टीमोरमध्ये जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीमध्ये काम केलं.
डॉ. कमल रणदिवे यांचं हे योगदान गुगलनं डूडलच्या माध्यमातून जगासमोर आणलं आहे.