(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dr. Amol Kolhe Speech : जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? अमोल कोल्हेंचा सवाल
Dr. Amol Kolhe Speech : पुरातत्व खात्याच्या नियमात बदल करून किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
Dr. Amol Kolhe Speech : जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? असा रोखठोक सवाल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत उपस्थित केला. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जात नाही. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार ठरावावर बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या काही नियमांवर प्रश्न उपस्थित केले. ब्रिटिशकालीन कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. संपूर्ण देशाची प्रेरणा असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावता येत नसल्याकडे खासदार अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले. जे सरकार 370 हटवू शकते. तेच सरकार पुरात्व खात्याच्या जुन्या कायद्यात बदल करून किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावू शकत नाही का, असा प्रश्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
बैलगाडी शर्यतीवर असलेल्या बंदीवर त्यांनी लक्ष वेधले. गोवंशाच्या वाढीसाठी असलेल्या बैलाचा समावेश वाघ, सिंह, अस्वल या सारख्या वन्य प्राण्यांच्या यादीत आहे. बीफ निर्यातीत भारताने 10 व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर उसळण घेतली. त्यामुळे भारताविरोधात असलेले, आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित गट जलीकट्टू, बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यासाठी वारंवार कोर्टात धाव घेत असल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला. सरकारने बैलाला Non Performing Animals (Registration) Rules मधून वगळण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.
केंद्र सरकारचे भाषणात कौतुक
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात काही सरकारच्या यशस्वी प्रकल्पांचा उल्लेख केला. डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याचा उल्लेख करत म्हटले की, माझ्या मतदारसंघात पुणे-नाशिक, पुणे-नगर, पुणे-शिक्रापूर तळेगाव चाकण या महामार्गावर नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याच्या माध्यमातून 20 हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, खासदार अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचेही आभार मानले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले, असेही त्यांनी म्हटले.
बाळ हिरडाला थेट बाजारपेठेशी जोडले पाहिजे, वन औषधी संशोधन प्रकल्प माझ्या मतदारसंघात सुरू करण्याबाबत आयुष मंत्रालयाने मंजुरी दिली असून कॅबिनेटची मंजुरी अद्याप त्याला मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.