(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anandacha Shidha: दिवाळीच्या तोंडावर अनेक लाभार्थी 100 रुपयाच्या किटच्या प्रतीक्षेत, पिशव्यांअभावी वितरण रखडलं
सरकारच्या घोषणेनंतर या वस्तू वेळेत वितरित झाल्या नसल्याचं वास्तव माझाने समोर आणलं. त्यानंतर अन्न व नागरीपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 20 तारखेपर्यंत या वस्तू पोहोचतील असं आश्वासन दिलं होतं.
मुंबई : दिवाळीसाठी (Diwali 2022) शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) आजपासून लोकांपर्यंत पोहोचेल असं आश्वासन अन्न व नागरीपुरवठा मंत्र्यांनी दिलं. मात्र राज्यभरातल्या अनेक रेशन दुकानांवर या किटचा पत्ताच नाहीय काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचल्या नसल्यानं तर काही ठिकाणी किटच्या पिशव्या मिळाल्या नसल्यानं वितरण रखडलंय. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली. या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार आहेत.
सरकारच्या घोषणेनंतर या वस्तू वेळेत वितरित झाल्या नसल्याचं वास्तव माझाने समोर आणलं. त्यानंतर अन्न व नागरीपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 20 तारखेपर्यंत या वस्तू पोहोचतील असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही सगळ्या रेशन दुकानावर किट पोहोचलेल्या नाहीत. आंनदाचा शिधा पुणे, नागपूर, सांगली जिल्ह्यातील रेशनिंगच्या दुकानात पोहोचलाय. त्याचं वाटपही होत आहे. तर दुसरीकडे बुलढाणा, औरंगाबाद, भंडारा या जिल्ह्यात अद्याप शिधा पोहचला देखील नाही.
राज्यात कुठे कुठे आणि किती आनंदाचा शिधा पोहोचला जाणून घेऊया
पुणे जिल्हा (Pune)
पुणे जिल्ह्यात वाटायच्या आनंदाच्या शिधाच्या साहित्यापैकी 55 टक्के शिधा आला आणि तो रेशनिंग दुकानात पोहचल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलय. पुणे जिल्ह्यात एकुण 9 लाख 15 हजार 662 शिधा किटची गरज आहे.
- साखर - 52.34 टक्के प्राप्त
- रवा - 65.53 टक्के प्राप्त
- चणाडाळ - 39.46 टक्के प्राप्त
- तर पामतेल 53.35 टक्के प्राप्त
झाल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलय. हे किट ज्या पिशव्यांमधून दिले जाणार आहे त्या पिशव्याही त्याच प्रमाणात प्राप्त झाल्याच पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
बारामती तालुका (Baramati)
बारामती तालुक्यता 220 रेशनिंग दुकानांपैकी 72 दुकानात किट पोहोचले आहे. बारामती तालुक्यात एकूण 82 हजार 200 लाभार्थी कुटुंब 100 रुपयांच्या किटमध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 लिटर पाम तेल, 1 किलो चणाडाळ आणि एक शासनाची पिशवी देण्यात येणार आहे. एकूण 148 रेशनिंग दुकानांमध्ये दोन दिवसांत हे किट पोहोचेल अस सांगण्यात आलं आहे. पुरेसे तेल नसल्याने हे किट पोहोचायला अडचणी होत आहेत. उद्या आणि परवा पर्यंत हे किट पोहोचवले जाईल असे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे
सांगली (Sangli)
सांगली जिल्ह्यात एकूण 1361 रेशन दुकानदारांपैकी 389 रेशन दुकानदारापर्यत शिधा पोहचला आहे. उद्यापर्यंत 70 टक्के शिधा पोहचवला जाईल असं पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- एकूण मंजूर शिधावस्तू-16,50,704
- एकूण प्राप्त शिधावस्तू-12,20,622
- एकूण अप्राप्त शिधावस्तू-4,30,082
नागपूर जिल्हा (Nagpur)
आनंदाचा शिधा या योजनेसाठी नागपूर शहरात 3 लाख 85 हजार कुटुंब पात्र आहे. त्यांच्यासाठी 2 लाख 95 हजार साखरेचे पाकिट आले आहे. 3 लाख 85 हजार तेलाचे पुडे आले आहे. 80 हजार रव्याचे पुडे आले आहे. तर 50 हजार चणा डाळीचे पुडे आले आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 लाख 11 हजार कुटुंब पात्र आहे.
त्यांच्यासाठी साखर आणि तेल शंभर टक्के प्राप्त झाला आहे. तर डाळ आणि रवा 50 टक्केच प्राप्त झाला आहे. शहर आणि ग्रामीण मिळून आठ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना वाटप देखील झाले आहे. चणाडाळ आणि रवा उद्या मोठ्या प्रमाणावर प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे. चार ही वस्तू एकत्रित करून देण्यासाठी पिशव्या आवश्यक प्रमाणात मिळालेल्या आहे.
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्ह्यात आनंदाच्या शिधा साहित्याचे एकूण 8 लाख लाभार्थी असून त्यासाठी 32 लाख शिधा पाकिटांची गरज आहे.
- पामतेल - 40 टक्के प्राप्त
- साखर- 20 टक्के प्राप्त
- चणाडाळ - 9 टक्के प्राप्त झालीय
- रवा फक्त 2 टक्के प्राप्त झाल्याचं पुरवठा विभागाकडून सांगण्यात येतय.
हे किट ज्या पिशव्यांमधून दिले जाणार आहे त्या पिशव्याचे प्रमाण कमी असले तरी योग्य ती व्यवस्था केली जाईल असे प्रशासनाच म्हणणं आहे. हे किट वाटपाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील एकूण 15 पैकी उद्या त्र्यंबक, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यात वाटप केले जाणार आहे. एकंदरीतच दिवाळी तोंडावर आली असतांना जिल्ह्यातील सर्व आठ लाख लाभार्थ्यांपर्यंत किट पोहोचेल की नाही? हा प्रश्नच आहे.
नांदेड (Nanded)
नांदेड जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आलेला नाही
हिंगोली (Hingoli)
हिंगोलीत किटमधील सर्व साहित्य हिंगोली जिल्हा प्रशासनाकडे आले आहे. परंतु किटच्या पिशव्या आल्या नाहीत त्यामुळे वाटप ठप्प आहे. हिंगोली जिल्ह्यात 2,21, 000 इतक्या किटची मागणी केली होती. तेवढे साहित्य उपलब्ध झाले आहे
धुळे (Dhule)
धुळे जिल्ह्यासाठी 2 लाख 99 हजार लाभार्थी आहेत. मागणीच्या तुलनेत फक्त 20 टक्के माल गोडाऊनला पोहचला आहे मात्र तो अद्याप रेशन दुकांनापर्यंत पोहचलेला नाही. 21 ऑक्टोबरपर्यंत रेशन दुकानात आनंद शिधा पोहचेल आणि 22 पासून वाटप सुरू होईल अशी माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बुलढाणा (Buldhana)
बुलढाणा जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आलेला नाही
वाशिम (Washim)
वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्याकरता फक्त चणा डाळ, वाशिम तालुक्यात साखर तर कारंजा तालुक्यात पाम तेल उपलब्ध आहे. येत्या दोन दिवसात सरकारकडून राशन कार्डवर 100 रुपयात मिळणाऱ्या वस्तू प्राप्त लाभार्थ्यांना वाटप होणार आहे.
औरंगाबाद (Aurangabad)
औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आलेला नाही
पालघर (Palghar)
पालघर जिल्ह्यात चार लाखाच्यावर लाभार्थी असून अजूनही शंभर रुपयांचा आनंदाचा शिधा पूर्णपणे प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे यांनी दिली आहे. ज्या चार वस्तू लाभार्थ्यांना मिळणार आहेत त्या पूर्ण वस्तू प्राप्त झाल्याशिवाय आम्हाला वाटप करता येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे..
भंडारा (Bhandara)
भंडारा जिल्ह्यात अर्धवट शिधा आला आहे त्यामुळे वाटप रखडले आहे