Balu Mama : लोकसंत बाळूमामांच्या भक्तांमध्ये बेबनाव, अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, प्रकरण नेमकं काय?
लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा (Balu Mama) यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु आहे. बाळूमामा यांचा भक्त म्हणून ओळख असलेल्या मनोहर भोसले यांच्याविरोधात पोलिसांत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत
पंढरपूर : लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु झाला असून बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करीत असल्यानं त्यांच्या निषेधाचा ठराव बाळूमामांचे समाधिस्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर या गावाने केला आहे. बाळूमामा यांच्या जीवनावरील मालिका सध्या टीव्हीवर जोरात सुरु असल्याने बाळूमामा यांच्याबाबत मोठी उत्सुकता सर्वसामान्य भक्तांमध्ये निर्माण होत आहे.
बाळूमामा यांचा भक्त म्हणून ओळख बनविल्यानंतर मोठ्या शहरात अध्यात्मिक गुरू म्हणून समोर येऊ लागलेल्या मनोहर मामा यांच्या विरोधात आदमापूर देवस्थान आणि ग्रामस्थांनी मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे आता या मामांच्या अडचणी वाढल्या असून यापुढे करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे बेकायदेशीर आश्रम चालू न देण्याचे आवाज उठू लागले आहेत. याच मनोहर भोसले यांच्या विरोधात दोन तक्रारी करमाळा पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही .
पुणे, मुंबई, नाशिक अशा मोठमोठ्या शहरातील राजकारणी, व्यापारी, उद्योजक दर अमावास्येला या उंदरगाव येथील अडचणीच्या ठिकाणी असलेल्या मनोहर मामा यांच्या मठात येत असत. अमावस्येल शेकडो वाहने ग्रामस्थांच्या पिकात उभी राहू लागल्यानं नाराजीला सुरुवात झाली होती. येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी पावत्या फाडल्या जाऊ लागल्या आणि भाविकांना चमत्कार दिसू लागल्यानं या छोट्याशा मठात हजारो भाविकांची गर्दी होऊ लागली. उजनीच्या बॅक वॉटरमुळे समृद्ध असलेल्या उंदरगाव ग्रामस्थांना याचा त्रास वाढू लागल्यावर मामांचा मावस भाऊ धनंजय कांबळे यांनी पुढाकार घेत आवाज उठवला आणि ग्रामस्थही इतक्या वर्षात पहिल्यांदा विरोधात उभे राहिले.
पाहा व्हिडीओ : Balu Mama : अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, काय आहे मामांची मनोहर 'कहाणी'?
अदमापूर देवस्थान आणि ग्रामस्थांनी मनोहरमामा यांच्या विरोधात मोहीम सुरु केल्यानं मामांच्या अडचणी वाढल्या. आपण बाळूमामा यांचा वंशज, शिष्य नसून केवळ भक्त असल्याचा खुलासा मनोहरमामा यांना करावा लागला . यानंतर मनोहर मामा यांचेवर सध्याच्या माठासाठी घेतलेल्या जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने करमाळा पोलिसांत दिली. यानंतर बारामती येथील रवींद्र म्हेत्रे यानं आपल्या पत्नीचं आजारपण दूर करतो म्हणून पैसे घेतले आणि ती बरी न झाल्यानं आपली फसवणूक केल्याची दुसरी तक्रार मनोहरमामा यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात दिली. यातील म्हेत्रे यांच्यावर मनोहरमामा यांनी यापूर्वीच खंडणी आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
आता या दोन्ही तक्रारी अर्जाचा तपास पोलीस करीत असून पहिली जमिनी संदर्भातील तक्रार महसूल विभागाकडे वर्ग केली जाणार असून दुसऱ्या तक्रारीत अंध श्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार, गुन्हा दाखल होतो का? याची पोलीस तपासणी करत आहेत. सध्या मनोहरमामा यांचा उभारत असलेल्या मठाला उंदरागाव ग्रामपंचायतीची मान्यता नसल्याचंही समोर आल्यानं मामांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता या मठामुळं सर्वसामान्य ग्रामस्थांना त्रास होत असल्यानं ग्रामस्थ हा मठ इथे चालू देणार नसल्याचं मामांचे मावसभाऊ धनंजय कमावलं सांगतात. सध्या कोरोनामुळे हा मठ बंद असून मनोहरमामा देखील उंदरागाव परिसरात नसले तरी आता भक्तीच्या नावाखाली सुरु असलेल्या या मठाचा वाद पोलीस आणि न्यायालयापर्यंत पोचला आहे. गोरगरीब भाविकाला देव सध्या दगडालाही सापडतो आणि तो त्याला आयुष्य जगण्याचं सुख समाधान मिळवून देतो. पण पैशाच्या आणि सत्तेच्या मागे लागलेल्या बड्या मंडळींना मात्र देव शोधण्यासाठी मनोहरमामा सारख्या माणसांपर्यंत पोचावे लागते हे दुर्दैवचं म्हणावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :